कोल्हापूरकडे जाणार्या आणि कोल्हापूरहून मिरजेकडे जाणार्या सर्व रेल्वे गाड्या गांधीनगर रेल्वेस्थानकात थांबवाव्यात ! – करवीर शिवसेनेचे निवेदन
गांधीनगर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर जवळ असलेल्या गांधीनगर येथे बाहेर गावाहून येणार्या ग्राहकांची संख्या मोठी आहे, तसेच मिरज, सांगली, हातकणंगले, जयसिंगपूर येथून येणार्या आणि जाणार्या कर्मचार्यांची संख्याही सहस्रो आहे. पूर्वी रेल्वे गांधीनगर येथे थांबत असल्याने मासिक पास काढल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होत होती. सध्या या स्थानकावर कोणतीच रेल्वे थांबत नसल्याने येथून प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी आणि तिकडून येण्यासाठी रेल्वे तिकीटापेक्षा पाचपट अधिक रक्कम व्यय करावी लागते. तरी या सर्वांचा विचार करता कोल्हापूरकडे जाणार्या आणि कोल्हापूरहून मिरजेकडे जाणार्या सर्व रेल्वे गाड्या गांधीनगर रेल्वेस्थानकात थांबवाव्यात, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना अन् गांधीनगर घाऊक-रोख व्यापारी संघटना यांच्या वतीने ‘छत्रपती शाहू महाराज टर्मिनस’ येथील स्थानकप्रमुख विजय कुमार यांना देण्यात आले.
मागण्यांची नोंद न घेतल्यास ‘रेल्वे बंद’ आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विक्रम चौगुले, बाबुराव पाटील, दीपक अंकल, योगेश लोहार, ‘रिटेल व्यापारी असोसिएशन’चे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, ‘होलसेल व्यापारी असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश आहुजा यांसह अन्य शिवसैनिक, व्यापारी उपस्थित होते.