प्रत्येक क्षणी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधिकेने अनुभवलेली कृपा !
१. शारीरिक वेदना होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. सेवा करतांना वेदनांची जाणीव न होणे : ‘मला १० वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास आहे. त्याकडे दुर्लक्ष करून मी सेवेत रहाण्याचा प्रयत्न करत होते. मला शारीरिक वेदना होत होत्या; पण मी सेवा करतांना मला वेदनांची जाणीव होत नव्हती. सेवा करून झाल्यावर मला वेदनांची जाणीव व्हायची. मला कधी कधी वेदनांमुळे रात्रभर झोप लागायची नाही. मला होणार्या वेदनांचे प्रमाण हळूहळू इतके वाढले की, मला चालणेही कठीण झाले. मी एक मास पूर्ण झोपून होते.
१ आ. रुग्णालयात भरती झाल्यावर अनुभवलेली गुरुकृपा !
मला मडगाव येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे आधुनिक वैद्यांनी माझे सर्व वैद्यकीय अहवाल बघितले आणि ‘उद्याच शस्त्रकर्म करायला हवे’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनाची त्यासाठी सिद्धता होत नव्हती.
१ आ १. शस्त्रकर्माच्या वेळी ॲलोपॅथीच्या वेगवेगळ्या गोळ्या घेतल्यावर गुरुकृपेने त्रास न होणे : मला १५ वर्षांपासून रक्तदाबाचा त्रास आहे आणि त्यासाठी मी ॲलोपॅथीची एक गोळी नियमित घेते. मला ॲलोपॅथीच्या अन्य कुठल्याच गोळ्या चालत नाहीत. आधुनिक वैद्यांनी मला शस्त्रकर्माच्या वेळी ॲलोपॅथीच्या वेगवेगळ्या गोळ्या दिल्या, तरी मला त्याचा काहीच त्रास झाला नाही. हे केवळ परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृपेमुळेच शक्य झाले.
१ आ २. हिंदी बोलता येत नसूनही आधुनिक वैद्यांशी हिंदी भाषेत संवाद साधणे आणि त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या माध्यमातून त्यांना हिंदीतून उत्तरे देत आहेत’, असे जाणवणे : शस्त्रकर्म कक्षात ३ आधुनिक वैद्य आणि १ परिचारिका होती. ते माझ्याशी हिंदीतून संवाद साधत होते. मीही त्यांना हिंदीतून उत्तरे देत होते. खरेतर मला हिंदी भाषा बोलता येत नाही. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या माध्यमातून त्यांना हिंदीतून उत्तरे देत आहेत’, असे मला तीव्रतेने जाणवले.
१ इ. वेदना होत असूनही प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन आठवून सेवा करणे : माझे मोठे शस्त्रकर्म होऊनही माझा उजवा पाय बधीर असतो; म्हणून आधुनिक वैद्यांनी मला आणखी एक वैद्यकीय तपासणी करायला सांगितली होती; परंतु कोरोना महामारीमुळे मी ५ मास त्यासाठी जाऊ शकले नाही. त्या स्थितीत मला वेदनाही पुष्कळ होत होत्या; पण ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, हे प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन आठवून मी सेवा करत होते.
२. मुलाला कोरोना झाल्याचे समजल्यावरही परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे स्थिर रहाता येऊन मुलाला नामजप करायला सांगणे
माझा मुलगा श्री. संतोष याने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मला (संतोषला) कोरोनाची लागण झाली आहे.’’ मी हे ऐकून क्षणभर अस्थिर झाले; परंतु नंतर स्वतःला सावरून मी त्याला सांगितले, ‘‘तू प्रार्थना आणि नामजप वाढव, म्हणजे सर्व व्यवस्थित होईल.’’ पूर्वी असे प्रसंग घडल्यावर मला पुष्कळ त्रास व्हायचा. ‘मी परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे या प्रसंगात स्थिर राहू शकले’, असे मला प्रकर्षाने जाणवले.
३. कृतज्ञता !
मी साधनेत नसतांना माझ्या वाट्याला नेहमीच दुःख आले; परंतु गुरुदेव, तेव्हाही तुम्हीच मला सांभाळले होते. ‘तुमच्यामुळेच आज मी जिवंत आहे’, असे मला वाटते.’ यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
– श्रीमती कमल गरुड (वय ६३ वर्षे ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१. १०. २०२०)