३१ जानेवारीला सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या किरिटापर्यंत पोचली !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !
कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव ३१ जानेवारीपासून चालू झाला. ३१ जानेवारी या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे देवीच्या पूर्ण मूर्तीवर पोचली. देवीचे मुखकमल उजळून देवीच्या किरिटाच्या वरपर्यंत हे सूर्यकिरण पोचले. त्यामुळे या वर्षातील उत्तरायणातील किरणोत्सव पूर्णक्षमतेने झाला.
देवस्थान समितीचे सचिव श्री. शिवराज नाइकवाडे यांनी यंदा किरणोत्सवाच्या अगोदरपासूनच किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. याचसमवेत भाविकांना किरणोत्सव थेट पहाता येण्यासाठी स्थानिक वृत्तवाहिनी, यू ट्यूब, समितीचे संकेतस्थळ, तसेच भवानी मंडपात एक मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.