२ जिल्हे वगळता राज्यात कोरोनाची तिसरी लाट शिखरावर ! – तज्ञांचे मत
मुंबई – मुंबई आणि ठाणे हे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट शिखरावर असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख ४५ सहस्र रुग्ण संख्येवरून २७ सहस्र रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरला आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून आता लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २९ जानेवारीला घोषित केले; परंतु राज्याच्या कोरोना कृती दलाने हे अमान्य केले आहे.
कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट उतरणीला लागली आहे; परंतु अन्य जिल्ह्यांमध्ये अजूनही तिसरी लाट शिखरावर आहे. बाधितांची संख्या आणि बाधितांचे प्रमाण अल्प असले, तरी संसर्ग अजूनही पुष्कळ प्रमाणात आहे. त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही.
राज्यात प्रतिदिन दीड लाख चाचण्या केल्या जातात. त्यातील ४० सहस्र चाचण्या मुंबईत केल्या जातात. त्या तुलनेत अन्य जिल्ह्यांमध्ये चाचण्यांचे प्रमाण फार अल्प आहे. त्यामुळे बाधितांची संख्या अल्प दिसत असली, तरी प्रत्यक्षात संसर्ग न्यून झाला, असे म्हणता येणार नाही, असे कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले.