सातारा येथील मंगळवार तळ्याच्या स्वच्छतेस प्रारंभ !
सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – शहराच्या पश्चिम भागातील ऐतिहासिक मंगळवार तळ्याचे पाणी पूर्णपणे हिरव्या रंगाचे झाले आहे. या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने तळे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे.
३१ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता तळे स्वच्छ करण्यास प्रारंभ करण्यात आला. हे ऐतिहासिक तळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वैयक्तिक मालकीचे आहे. जेव्हा या तळ्यात गणेशमूर्ती विसर्जन होत होते, तेव्हा तळे इतके अस्वच्छ होत नव्हते; मात्र विसर्जन बंद झाल्यापासून तळे प्रचंड प्रमाणात अस्वच्छ होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना अस्वच्छता आणि दुर्गंधी यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे तळ्यातील जीवसृष्टीही धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मासे मोठ्या प्रमाणात मृत आढळून आले होते. (या सर्व गोष्टी प्रशासनाच्या लक्षात येत नाहीत का ? – संपादक)