कोल्हापूर येथे क्रांतीकारकांची गाथा उलगडणारा दीर्घांक ‘द प्लॅन’ ४ फेब्रुवारी या दिवशी होणार ! – लक्ष्मीदास जोशी, सचिव, संस्कार भारती
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने
कोल्हापूर, ३१ जानेवारी (वार्ता.) – भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतीकारकांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्रात इंग्रज अधिकारी ‘जॅक्सन’ आणि ‘रँड’ यांचा वध या दोन घटनांनी स्वातंत्र्यलढ्याला बळ प्राप्त झाले. या घटना यशस्वी करणारे तीनही चापेकर बंधू, महादेव रानडे, अनंत कान्हेरे, केशव कर्वे, विनायक देशपांडे या क्रांतीकारकांची योजना, ही योजना आखतांना त्यांनी केलेला विचार, समर्पणाची केलेली सिद्धता उलगडून दाखवणारा दीर्घांक ‘द प्लॅन’ ४ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती ‘संस्कार भारती’चे सचिव लक्ष्मीदास जोशी यांनी ३१ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. याचे आयोजन भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केले जात आहे.
१. ‘संस्कार भारती कोल्हापूर महानगर’ आणि ‘म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर’ यांचा हा संयुक्त उपक्रम असून दीड घंट्यांचा हा दीर्घांक केवळ ८ कलाकार सादर करणार आहेत.
२. या दीर्घांकासमवेत ‘आझादी ७५ एक शाम शहिदोंके नाम’ या विशेष देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यात ‘संस्कृत वन्दे मातरम्’, ‘साधना के देश में’, ‘भारत हमारी माँ है’ अशा काही नाविन्यपूर्ण वेगळ्या धाटणीच्या गीतांचा समावेश आहे. ‘म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर’ने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
३. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विशेषतः तरुण पिढीतील राष्ट्रप्रेम जागृत करणे आणि त्याचा प्रसार-प्रचार करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी मिळून एकत्रित १०० रुपये एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. सदर प्रवेशिका केशवराव भोसले नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत. तरी अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन या दोन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
४. सदर पत्रकार परिषदेला ‘संस्कार भारती कोल्हापूर महानगर’चे उपाध्यक्ष चंद्रशेखर फडणीस, सतीश आंबर्डेकर, योगेश प्रभूदेसाई, ‘म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश सोनुले, उपाध्यक्ष इंद्रजीत जोशी, सचिव महेश कदम उपस्थित होते.