परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन !
|
मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी करत राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबई, नागपूर, संभाजीनगर, बीड, धाराशीव, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. काही ठिकाणी वाहने अडवणे, दगडफेक करणे आदी हिंसक प्रकार घडले. ‘हिंदुस्थानी भाऊ’ उपाख्य विकास पाठक यांनी समाजमाध्यमांतून दिलेल्या चिथावणीमुळे हे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
‘परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रहित करा !’ या मागणीसाठी मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याबाहेर, नागपूर येथे विविध ठिकाणी, संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तर पुणे येथे १२ वीच्या बोर्डाच्या कार्यालयाबाहेर सहस्रोंच्या संख्येने १० वी आणि १२ वी चे विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी एकत्र आले. यामुळे मुंबईत आणि अन्य शहरांत वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबईत मुंब्रा, दिवा, मुलुंड येथूनही विद्यार्थी आले होते.
शिक्षणमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांचा सौम्य लाठीमार !
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जमलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आणि अन्य ठिकाणीही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. नागपूर येथे एका शाळेच्या बसच्या काचाही फोडण्यात आल्याची घटना समोर आली. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘‘कोरोनाची स्थिती असतांना मुले रस्त्यावर येणे, हे योग्य नाही. मुलांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. मी नेहमी चर्चा करण्यासाठी सिद्ध असते. आंदोलन करण्यापूर्वी चर्चा करणे आवश्यक होते. आम्हाला विद्यार्थ्यांचे हितच पहायचे आहे. तुमच्या काही सूचना असतील, तर त्या आम्ही स्वीकारू.’’
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू या संदर्भात म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तोंडावर रस्त्यावर आणणे योग्य नाही. निवेदन द्या आणि चर्चा करा. या आंदोलनामागे कोण आहे, ते गृहमंत्रालय पाहील. परीक्षांचा निर्णय सर्व प्रकारचा विचार करून घ्यावा लागेल.’’
शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची चेतावणी हिंदुस्थानी भाऊ उपाख्य पाठक यांनी समाजमाध्यमांद्वारे ३० जानेवारीला दिली होती. ‘ऐकले नाही, तर तांडव करू’, अशा भाषेत त्यांनी सरकारला चेतावणी दिली होती. ‘मी राजकारण किंवा पक्ष यांच्याशी जोडलेलो नाही. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे ही मुले रस्त्यावर आली आहेत’, असे पाठक यांनी माध्यमांना सांगितले.
‘ऑनलाईन वर्ग घेतले गेले. त्यामुळे झालेला अभ्यास समजला नाही आणि आता परीक्षा ऑफलाईन कशी देणार ?’, असे विद्यार्थ्यांनी माध्यमांना सांगितले.
अचानकपणे उद्भवलेल्या आंदोलनाविषयी गृहमंत्र्यांचा चौकशीचा आदेश !अचानकपणे उद्भवलेल्या या प्रकाराविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते; मात्र ‘याला काही दिवस झाल्यानंतर अचानक विद्यार्थी रस्त्यावर का उतरले ?’ याचा शोध पोलीस घेत आहेत. |