पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना स्वसंमोहन तंत्राविषयी आलेले विलक्षण अनुभव !
पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अन् त्यांच्या स्वसंमोहन तंत्राविषयी आलेले विलक्षण अनुभव !
पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आत्याची (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांची) मुलगी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आते बहीण आहे.
३१ जानेवारी २०२२ या दिवशीच्या लेखात आपण श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या मनावर विवाहोत्तर जीवनात झालेला परिणाम आणि त्यांना आलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या विलक्षण अनुभूती यांविषयी पाहिले. आजच्या लेखात आपण यजमानांच्या निधनामुळे श्रीमती अनुपमा देशमुख यांच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर, परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दैवी भेट आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.
(भाग ३)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/548566.html
६. अकस्मात् झालेले यजमानांचे निधन आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर
‘ऑक्टोबर १९७८ मध्ये मुलांना दिवाळीची सुटी असल्याने मी त्यांच्यासह पुण्याला गेले होते. त्या वेळी भटगुरु (घरातील पूजा करणारे आणि भविष्याविषयी जाणणारे) मला म्हणाले, ‘‘मला असे दिसत आहे की, तुमच्या यजमानांची प्रकृती बिघडणार आहे. त्यांना पोटाचा विकार होणार आहे. तेव्हा त्यांना जेवणाचे पथ्य पाळायला सांगा.’’ त्यांनी मला हनुमानचालीसा, शिवलीलामृत, स्वामी समर्थांची पोथी, देवीकवच (चण्डिकवच), अर्गला स्तोत्र (अनेक देवींची स्तुती असणारे स्तोत्र), देवीसूक्त, अथर्वशीर्ष हे सर्व नियमितपणे वाचायला सांगितले. ते मी चालू ठेवले. एप्रिल १९७९ मध्ये मुंबई आणि सुरत येथे काविळीची मोठी साथ आली. त्यात अनेक तरुण मरण पावले. ही कावीळ (हेपॅटायटीस बी.) एरव्हीच्या काविळीसारखी बरी होणारी नव्हती. यजमानांचे केवळ १५ दिवसांच्या आजारपणाचे निमित्त झाले. सर्व तपासण्या, रुग्णालयामध्ये ठेवूनही काही गुण न येता २०.४.१९७९ या दिवशी माझ्या यजमानांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय ३९ वर्षे, माझे ३२ वर्षे, सिद्धार्थचे (मुलाचे) १० वर्षे आणि शीतलचे (मुलीचे) ७ वर्षे होते. त्या वेळी आमच्या लग्नाला केवळ ११ वर्षे झाली होती. त्यानंतर माझ्यासमोर केवळ अंधारच होता; पण सावरणे आवश्यक होते.
७. प्रतिकूल काळात मनोधैर्य ठेवून आणि काटकसर करून संसार करणे
७ अ. डॉक्टर नानासाहेब देशमुख (सासरे) यांच्यामुळे घर चालवण्यात साहाय्य होणे : यजमान गेल्यानंतर अकस्मात् मला सर्व बाजूंनी संकटांनी घेरले होते. त्या वेळी माझ्यासमोर नोकरी करण्यावाचून पर्याय नव्हता; परंतु लहान मुले आणि माझी शारीरिक स्थिती यांमुळे मला नोकरी करणे अवघड होते. माझे आजेसासरे डॉ. नानासाहेब देशमुख यांनी गिरगाव, मुंबई येथील ‘डॉक्टर देशमुख लेन’मध्ये ४ माळ्यांच्या दोन इमारती बांधल्या होत्या. त्या इमारतींच्या रूपात डॉ. नानासाहेब माझ्या साहाय्याला धावून आले. इमारतीतील भाडेकरूंकडून मिळणार्या भाड्यामुळे मला आर्थिक साहाय्य झाले. पुढे मी माझ्या लहान मुलांसाठी जीवनात आलेल्या सर्व लढायांना यशस्वीपणे तोंड दिले.
७ आ. काटकसर करून संसार करणे आणि नायिकेच्या भूमिकेसाठी आलेल्या ‘ऑफर्स’ नाकारणे : मी पुष्कळ काटकसर करून आणि सतत हिशोब करत घर चालवले. मी मनाशी ठरवले होते, ‘अगदीच निरुपाय (नाईलाज) झाला, तर मी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी यांत काम करीन.’ सुदैवाने परमेश्वराने माझ्यावर तशी वेळ येऊ दिली नाही. नंतर हौस म्हणून मी अगदी थोडी अभिनयाची कामे केली. त्या वेळी नायिकेच्या भूमिकेसाठी मला पुष्कळ प्रस्ताव (ऑफर्स) येत होते; पण मी ते नाकारले.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दैवी भेट, त्यांच्या उपचारांचा झालेला लाभ आणि आलेल्या अनुभूती
८ अ. एका दैनिकातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संमोहनाविषयीचा लेख वाचून त्यांना भेटणे आणि त्यांनी मनातील सुप्त ताणामुळे आजार असल्याचे सांगणे : त्यानंतर वर्ष १९८० मध्ये मी एका दैनिकामध्ये डॉ. जयंत आठवले यांचा लेख वाचला. ते संमोहन उपचारशास्त्राचे डॉक्टर होते. त्यांनी हे शिक्षण भारतात पूर्ण केले होते. ते इंग्लंडमध्ये ८ वर्षे राहून १९७८ या वर्षी भारतात परत आले होते. दैनिकात त्यांनी ‘या शास्त्रामुळे डोकेदुखी, निद्रानाश आणि तणाव अशासारखी दुखणी बरी होतात’, असे लिहिले होते. त्यामुळे मी लगेच त्यांना भेटले. त्यांनी माझ्या आजाराविषयी माहिती भरायला मला १० पानांची प्रश्नावली (फॉर्म) दिली. मी त्यात भरलेली माहिती वाचून त्यांनी ‘माझ्या सासूबाईंच्या वागण्याचा त्रास झाल्याने मला हे आजार झालेले आहेत’, असा निष्कर्ष काढला. मी त्यांना सांगितले, ‘‘त्या जाऊन आता साडेसात वर्षे झाली आहेत. त्यामुळे मला आता त्रास कसा होऊ शकतो ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हा ताण तुमच्या मनात खोलवर जाऊन बसला आहे. माणसाचे मन हे एखाद्या हिमनगाप्रमाणे पाण्याच्या वर १/८ (जागृत, बाह्य मन) आणि ७/८ पाण्याखाली (अंतर्मन) असे असते. आपल्या आयुष्यातील कटू अनुभव अंतर्मनात जाऊन दडतात आणि विविध आजारांच्या रूपांत ते बाहेर येत असतात. त्यासाठी उपचारांची आवश्यकता असते. माणसाला संमोहन उपचार शास्त्राने अंतर्मनाला सूचना देऊन हे उपचार करावे लागतात.’’
८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून घेतलेले उपचार आणि स्वयंसूचना यांमुळे व्यक्तीमत्त्वात आमूलाग्र पालट होऊन सर्व दुखणी बरी होणे : त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे शीव येथे उपचारांसाठी जाऊ लागले. प्रथम आठवड्यातून ३ दिवस, पुढे आठवड्यातून १ दिवस, मग १५ दिवसांतून एक दिवस आणि नंतर मासातून १ दिवस असे करत हे उपचार पूर्ण झाले. त्यांनी मला ‘स्वयंसूचना कशा घ्यायच्या ?’, हे शिकवले. त्यामुळे माझ्यामध्ये आमूलाग्र पालट झाला आणि माझा आत्मविश्वास वाढला. माझा ताण अल्प होऊन डोकेदुखी, आम्लपित्त (ॲसिडिटी), मानेच्या मणक्यांना सूज येणे (स्पॉन्डिलायटीस) ही दुखणी बरी झाली. या उपचारानंतर आमच्या शेजारी रहाणार्या रॉड्रिक्स यांच्या मुलांना माझ्यात झालेला पालट जाणवला. ते म्हणाले, ‘‘ही पूर्वीची सुधाआन्टी नाही. ही वेगळीच आणि छान सुधाआन्टी आहे.’’ (माझे माहेरचे नाव सुधा नेने आहे.) उपचारांपूर्वी माझ्या मनावर दडपण असल्याने नातेवाइकांना माझे वागणे अयोग्य वाटायचे. उपचारांनंतर मनावरील दडपण दूर झाल्याने मी नातेवाइकांकडे गेल्यावर सर्वांशी पूर्वीप्रमाणेच बोलू लागले. त्यामुळे माझ्या नातेवाइकांनीही माझ्यातील हा पालट बरोबर ओळखला. हे स्वयंसूचना तंत्र मी अजूनही अंमलात आणते आणि कायम चालू ठेवणार आहे. माझी मुले, आई, काही मैत्रिणी आणि काही मुली यांना मी या स्वयंसूचना दिल्या, त्याचा त्यांनाही चांगला लाभ झाला.
८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपचाराच्या वेळी आलेल्या अनुभूती
८ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माझ्या मागे गणपति दिसणे आणि मी गणपतीची उपासना करत असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे मी माझ्या त्रासासाठी उपचार घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘तुमचे कुलदैवत कुठले ?’’ मी सांगितले, ‘‘श्री योगेश्वरीदेवी आणि श्री व्याडेश्वर.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मग मला तुमच्या मागे गणपति का दिसत आहे ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘मी नेहमी गणपतीची पूजा, नामजप इत्यादी करते. त्यामुळे दिसत असावा.’’
८ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका रुग्णाच्या झोपण्याची दिशा पालटल्यावर त्याचा आजार बरा होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे एक रुग्ण आले होते. त्यांच्यावर स्वयंसूचनांचा परिणाम होत नव्हता. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ध्यानात जाऊन पाहिल्यावर ‘रुग्णाच्या शयनगृहाची एक उजवी बाजू अनिष्ट शक्तींनी भरलेली आहे’, असे त्यांना दिसले. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना ‘तुम्ही कुठल्या दिशेला झोपता ?’, असे विचारले. तेव्हा ते अनिष्ट शक्ती असलेल्या दिशेलाच झोपत होते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही डाव्या बाजूला झोपा.’’ तसे केल्यावर त्या रुग्णाचा आजार बरा झाला.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने लाभलेला अनेक संतांचा सत्संग आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
पुढे पुढे परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात आले की, अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ आहे; म्हणून त्यांनी अध्यात्माचा अभ्यास चालू केला. त्यांच्या भाग्यामुळे त्यांना प.पू. भक्तराज महाराजांसारखे गुरु आणि अनेक संत भेटले. त्या वेळी त्यांनी लोकांसाठी अध्यात्माचे अभ्यासवर्ग घेणे चालू केले. मी आणि आईही या अभ्यासवर्गांना गेलो होतो. त्यांच्याकडे अनेक संत यायचे. त्या वेळी ते आम्हाला बोलवायचे.
९ अ. प.पू. भुरानंदबाबा (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू) यांच्या दर्शनाच्या आधी स्वप्नात दिवंगत वडील येणे आणि प.पू. भुरानंदबाबा वडिलांसारखेच दिसत असल्याने वडील स्वप्नात येण्याचे कारण कळणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांकडे प.पू. भुरानंदबाबा आले होते. त्या वेळी आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. त्याच्या २ – ३ दिवस आधी ती. बापू (माझे वडील) माझ्या स्वप्नात येत होते. वास्तविक त्यांना जाऊन ८ – १० वर्षे झाली होती आणि कधी जुन्या आठवणी निघाल्या किंवा त्यांचा चित्रपट दूरदर्शनवर पाहिला, तर ते केव्हातरी स्वप्नात येत असत. प.पू. भुरानंदबाबांना पाहिल्यावर प.पू. भुरानंदबाबा अगदी हुबेहुब माझ्या वडिलांसारखे दिसत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘माझे वडील प्रतिदिन स्वप्नात का येत होते ?’, याचे कारण मला कळले. माझ्या वडिलांनी अनेक चित्रपटांत काम केले. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटातील गौतमऋषि आणि सती अहिल्या यांचा पुत्र शतानंदऋषि यांचे रूप प.पू. भुरानंदबाबा यांच्याप्रमाणे होते. तेव्हा त्या वेषभूशेत माझे वडील जसे दिसायचे, तसेच प.पू. भुरानंदबाबा दिसत होते. इतकेच नाही, तर त्यांची बोलण्याची, बसण्याची ढबही (पद्धतही) तशीच होती. त्यामुळे माझे डोळे पाणावले.
९ आ. प.पू. भुरानंदबाबा यांनी आम्ही नेलेले पराठेच खाणे : त्या वेळी आम्ही बटाट्याचे पराठे नेले होते आणि तो डबा सौ. कुंदाताईंकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पत्नींकडे) देऊन त्यांना सांगितले, ‘‘यात आले-लसूण आहे. ते ज्यांना चालेल, त्यांनाच वाढा.’’ प.पू. भुरानंदबाबांनी पुष्कळ आग्रह करून आम्हा दोघींनाही जेवायला बसवले. दुसर्या दिवशी सौ. कुंदाताईंनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आज बाबांनी (प.पू. भुरानंदबाबांनी) केवळ तुम्ही आणलेले पराठेच खाल्ले. त्यांच्या समवेत आलेले त्यांचे शिष्य म्हणाले, ‘‘आज सकाळी ठाण्याहून निघतांना महाराज म्हणाले, ‘‘आज पराठे खाने का दिल (मन) करता है ।’’ हे सर्व ऐकून आम्हाला इतका आनंद झाला की, त्याचे वर्णन शब्दांत करता येणे कठीण आहे.
९ इ. पू. झुरळे महाराजांच्या भेटीच्या वेळी सात्त्विक भाव जागृत होणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांच्याबरोबर डोंबिवलीतील प.पू. झुरळे महाराजांच्या दर्शनाला गेलो. त्या वेळी त्यांना नमस्कार केल्यावर मला रडू येऊ लागले. मला त्याचे कारण ठाऊक नव्हते. त्यामुळे मला एकदम संकोचल्यासारखे झाले. प.पू. महाराज मला म्हणाले, ‘‘किती वर्षे वाट पहायला लावलीत.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुमचा सात्त्विक भाव जागृत झाला. छान झाले !’’ त्यांचे मोठे भाऊ ती. अप्पा (आताचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले) म्हणाले, ‘‘प.पू. महाराजांनी तुम्हाला त्यांच्या परिवारात सामील करून घेतले.’’ त्यानंतर मीही आईच्या समवेत चार वेळा माहिमहून डोंबिवलीला जाऊन त्यांच्या सत्संगाचा लाभ घेतला.
– श्रीमती अनुपमा देशमुख (सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेने आणि कै. राजा नेने यांच्या कन्या), पुणे (१६.१.२०२२)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
(भाग ४.) ‘पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले विलक्षण अनुभव !’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/549150.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |