आधुनिक वैद्यांकडे खंडणी मागणारा अटकेत !
महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त कधी होणार ? – संपादक
नगर – पाथर्डी येथे कोविड सेंटर चालवणार्या आधुनिक वैद्यांकडे ३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात प्रत्यक्ष पैसे स्वीकारतांना एकाला पकडले आहे. मच्छिंद्र आठरे असे त्याचे नाव असून शैलेंद्र जायभाय, मिथुन डोंगरे आणि नवनाथ उगलमुगले हे पळून गेले आहेत. आरोपींमध्ये माध्यमिक शाळेचे दोन शिक्षक, एक शिक्षण संस्थाचालक आणि राजकीय पक्षाचा कार्यकर्ता यांचा समावेश आहे. जायभाय यांनी माहिती अधिकारात डॉ. गर्जे यांच्या रुग्णालयाची माहिती घेऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास तक्रारी आणि अपकीर्ती करून रुग्णालय बंद पाडण्याची धमकीही दिली होती. डोंगरे यांनी मध्यस्थी करत ४ लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरल्यावर डॉ. गर्जे यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर वरील कारवाई करण्यात आली.