WHO संकेतस्थळावरील मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग दाखवला !
तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांची पतंप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार
भारताच्या सरकारी यंत्रणाच्या हे का लक्षात आले नाही ? वास्तविक त्यांनीच स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित होते ! – संपादक
नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ‘कोव्हिड-१९’ संदर्भातील संकेतस्थळावरील मानचित्रात जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा, तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचे दाखवले जात आहे, असे पत्र तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
https://t.co/6FjbMmtiN1 pic.twitter.com/BE1Rl0fQS7
— DR SANTANU SEN (@SantanuSenMP) January 30, 2022
सेन यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, मी जेव्हा या संकेतस्थळावरील निळ्या भागावर क्लिक केले, तेव्हा भारताच्या ‘कोव्हिड-१९’ची माहिती दाखवण्यात आली होती. या वेळी जम्मू-काश्मीर राज्यावर क्लिक केले, तेव्हा पाकिस्तानची माहिती दाखवण्यात आली. असेच चीनच्या संदर्भातील माहितीविषयीही दिसून आले. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक गंभीर गोष्ट असून याची सरकारने नोंद घेऊन ती सुधारली पाहिजे. ही आपल्या देशातील नागरिकांसाठी फार खेदाची गोष्ट आहे. या प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी चौकशीचे आदेश द्यावेत आणि या मोठ्या चुकीच्या संदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही सेन यांनी पत्रात केली आहे.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |