मतदारराजा, सावध हो ! चेंडू आपल्या रिंगणात आला आहे !

१४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…!

‘गोव्यात निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. १४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याद्वारे गोव्यातील नागरिक ४० आमदारांना निवडून देतील. हे आमदार पुढील पाच वर्षे गोव्याच्या राज्यकारभाराची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे योग्य आमदारांची निवड करणे, हे नागरिकांचे उत्तरदायित्व आहे. गोव्यातील जनता सुशिक्षित, सुसंस्कृत, विवेकशील, धार्मिक आणि शांतीप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. आदर्श राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने पुढील आवश्यक घटकांचा ते नक्कीच विचार करतील, ही अपेक्षा ! या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध आणि सतर्क करण्याचा अन् त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

१. तरुण पिढीला व्यसनाधीन करणारे लोकप्रतिनिधी नकोत !

निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक अवैध आणि अनैतिक घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘गोव्यात लाखो रुपये किमतीचे अवैध मद्य जप्त’; ‘अमली पदार्थांचा साठा जप्त’; ‘रोख रकमेची ये-जा रोखण्यासाठी रेल्वेस्थानक आणि राज्याच्या सीमा येथील सुरक्षायंत्रणेत वाढ’, अशा स्वरूपाच्या बातम्या वाचनात आल्या. वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणार्‍या मद्य आणि अमली पदार्थ यांच्या जप्तीच्या बातम्या म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात निवडणुकीच्या कालावधीत मद्य आणि अमली पदार्थ यांचा पुष्कळ मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. शासनकर्ते तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना विविध प्रलोभने दाखवतात. त्यामध्ये मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन आलेच. भारताचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी नेण्याचे दुष्कृत्य सध्याचे काही शासनकर्ते करतांना दिसतात.

२. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधींकडून सुराज्याची अपेक्षा काय करणार ?

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांच्या विरोधात गुन्हे नोंद असल्याच्या बातम्या वाचनात आल्या. भारताच्या एका माजी निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे, ‘निवडणुकीतील पैसा आणि बळ यांच्या वापरामुळे सध्याची लोकशाही दुर्बल झाली आहे.’ पैसा आणि बळ यांचा वापर करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती सत्ताधीश झाल्याने आज सर्वत्र भ्रष्टाचार आणि कुशासन यांचे प्रमाण वाढत आहे.

३. नीतीमान लोकप्रतिनिधींची निवड करा !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये पक्ष पालटण्याची स्पर्धाच लागली आहे. ‘स्वार्थ’ या एकाच निकषावर निवडणूक लढवली जात आहे’, असे म्हटल्यास ते अयोग्य ठरणार नाही. पक्षनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, समाजहित, नीतीमत्ता यांना मूठमाती देण्याचे काम या पक्षबदलू नेत्यांनी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. उद्या निवडून आल्यानंतर ही नेतेमंडळी स्वार्थासाठी पुन्हा पक्ष पालटण्यास मागे-पुढे पहाणार नाही, हे निश्चित !

४. ही कुठली लोकशाही, ही तर घराणेशाही !

सत्तालोलुप राजकारणी राजकारणात स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्वतःच्या बायका-मुलांनाही राजकारणात खेचतात. आपल्या सभोवतालच्या मतदारसंघांमध्ये त्यांना उभे करून पैसा आणि बळ यांचा वापर करून त्यांना निवडून आणतात. ‘आपण सत्ता उपभोगली आहे, आता इतरांना संधी देऊ’, असा विचार ते कधीच करत नाहीत. घराणेशाहीमुळे देशाची कशी हानी झाली, हे आपण अनुभवले आहे. जनहित आणि राष्ट्रहित जपण्यासाठी राज्यात घराणेशाहीला थारा देऊ नये, हीच अपेक्षा !

५. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांना बळी पडू नका !

विविध राजकीय पक्षांनी मतदारांना वेगवेगळी आश्वासने देत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. निवडून आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता केली जाईल कि मतदाराची फसवणूक झालेली असेल ? हे पुढील काळच ठरवणार आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहिल्यास मतदारांचा अपेक्षाभंगच झालेला आहे. त्यामुळे पोकळ आश्वासनांना बळी न पडता मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे.

६. व्यावहारिक गोष्टींसाठी देवाला वेठीस धरले जाणे

काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांना देवासमोर उभे केले आणि त्यांना पक्ष न पालटण्याची शपथ दिली. या वेळी त्या उमेदवारांच्या चेहर्‍यांकडे बघितले, तर देवाप्रती भाव किंवा आदर कुठेच दिसत नव्हता. ‘लोकप्रतिनिधींच्या या कृती म्हणजे राजकीय ‘स्टंट’ आहे’, असे वाटते. अशा प्रकारच्या व्यावहारिक गोष्टींसाठी देवतांना वेठीस धरणे, हा एक प्रकारे देवतांचा अवमानच आहे.

श्री. उमेश नाईक

७. भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार आणि अनीती यांना थारा नको !

अशा प्रसंगी रामराज्याची आठवण आल्याविना रहात नाही. रामराज्यात प्रजा सुखी आणि समाधानी होती. याचे एकमेव कारण म्हणजे प्रभु श्रीरामासारखा आदर्श राजा होता. गोव्यातील जनताही सुख, समाधान आणि शांती यांची अपेक्षा करत आहे. शासनकर्ते आदर्श हवेत. ‘जनसेवा ही ईश्वरसेवा आहे’, या भावाने शासनकर्त्यांनी स्वत:चे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अनीती यांना थारा न देता शासन चालवले पाहिजे. असे झाल्यास वेगळ्या आश्वासनांची आवश्यकताच भासणार नाही. केवळ पोकळ आश्वासने देणारे नव्हेत, तर सुशासन देणार्‍या लोकप्रतिनिधींची निवड करण्याचे मोठे दायित्व मतदारांसमोर आहे.

८. परशुराम भूमीचे श्रेष्ठत्व जपण्याची संधी !

श्रीविष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी यज्ञयाग करण्यासाठी गोमंतभूमीची निर्मिती केल्याचे आपण इतिहासात वाचले आहे. गोवा ही देवभूमी आहे. या देवभूमीतील लोकप्रतिनिधींही आदर्श असणे अपेक्षित आहे. प्रजेची ऐहिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर प्रगती साधणारे हवेत. अशा आदर्श शासनकर्त्यांना निवडून आणण्याची चांगली संधी गोव्यातील नागरिकांना मिळाली आहे. नागरिकांनी या संधीचे सोने करावे, ही अपेक्षा !’

– श्री. उमेश नाईक, माजी मुख्याध्यापक, फोंडा, गोवा. (२९.१.२०२२)