‘आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही आणि म्हणणारही नाही !’
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे साळसूद वक्तव्य
सोलापूर – आम्ही कुणाला वाईन प्या, असे म्हणू शकत नाही आणि म्हणणारही नाही; कारण मद्यपान करू नये, हाच महत्त्वाचा विषय आहे. सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच, तरीही जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात. मद्यपान हानीकारक आहेच, त्याविषयीची जागृती आपण करत असतो. वाईन उद्योगाला द्राक्ष बागायतदारांच्या उत्पादकतेच्या संदर्भातील दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्यपानास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला नाही, असे मत आरोग्यमंत्री रोजेश टोपे यांनी केले. ते सोलापूर दौर्यावर असतांना बोलत होते.
राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार आणि वाईन उद्योग यांस चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने आणि सुपरमार्केट, तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाईन विक्रीस अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. (एकीकडे मद्यपानाच्या वस्तूंवर धोक्याची सूचना लिहायची आणि दुसरीकडे त्याची सर्रास विक्री करायची, हे मद्यपानाचे एकप्रकारे समर्थन केल्यासारखेच आहे. – संपादक)