प्रेमभाव आणि अखंड नामजप करणार्या पू. (सौ.) पद्मावती बाळासाहेब केंगेआजी (वय ८९ वर्षे) यांचा देहत्याग !
नगर – जिल्ह्यातील शीरेगाव येथील सनातनच्या ३७ व्या व्यष्टी संत पू. (सौ.) पद्मावती बाळासाहेब केंगेआजी (वय ८९ वर्षे) यांनी २९ जानेवारी २०२२ या दिवशी सायंकाळी ७.०५ वाजता त्यांच्या नगर येथील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला. त्याच रात्री ११.३० च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पू. केंगेआजी पुष्कळ प्रेमळ आणि आदर्श गृहिणी होत्या. वृद्धापकाळामुळे बुद्धीवर नियंत्रण नसतांनाही त्यांचा अखंड नामजप चालू होता. घरी आलेल्यांना तसेच घरातील व्यक्तींनाही त्या सतत नामजप करायला सांगत असत. त्यांची परात्पर गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा होती. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या पू. केंगेआजींच्या संपर्कात असायच्या. पू. आजी त्यांची सतत आठवण काढत असत. त्या बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या आठवणी नेहमी सांगत असत.
त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, ३ सुना, २ मुली, १ जावई, ९ नातवंडे, ४ नात जावई आणि ४ नात सुना असा परिवार आहे.
पू. (सौ.) पद्मावती बाळासाहेब केंगे या १७ डिसेंबर २०१७ या दिवशी सनातनच्या ३७ व्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. पू. (सौ.) केंगेआजींचे कुटुंब हे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करतात.
अन्य अनुभुती
पू. केंगेआजींनी देह ठेवल्यानंतर मन पुष्कळ स्थिर असणे ! – सौ. सुचित्रा केंगे (पू. केंगेआजींच्या धाकट्या सून)
एरव्ही घरकाम करतांना माझ्या मनाची स्थिरता अल्प असते; पण पू. केंगेआजींनी देह ठेवल्यानंतर मात्र माझे मन पुष्कळ स्थिर होते. सर्व सेवा स्थिरतेने होत होत्या. घरी येणारे सर्व नातेवाइकही ‘नेहमीपेक्षा पुष्कळ स्थिर होते’, असे प्रकर्षाने जाणवले.
पू. केंगेआजींच्या पार्थिवाच्या जवळ गेल्यानंतर आपोआप निर्विचार जप चालू होणे !
पू. केंगेआजींनी देहत्याग केल्याचे समजल्यावर मनाला पुष्कळ शांत वाटत होते. पू. आजींच्या निवासस्थानीही वातावरणात चैतन्य आणि अधिक प्रमाणात शांतता जाणवत होती. पू. आजींचा तोंडवळा शांत वाटला, तसेच ‘त्या ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवले. पू. आजींच्या पार्थिवाच्या जवळ गेल्यावर आपोआप ‘निर्विचार’ हा जप चालू होऊन ‘आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवले. पू. आजींच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर त्यामध्ये जिवंतपणा जाणवला. त्यांच्या घरातील व्यक्तींनाही असेच जाणवले. – कु. श्वेता पट्टणशेट्टी आणि कु. प्रतीक्षा कोरगावकर, नगर.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |