नागपूर येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांची आधुनिक वैद्यांना मारहाण !
रुग्णालयातील साहित्याची तोडफोड
नागपूर – येथे उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेले रुग्णाचे नातेवाईक आणि मित्र यांनी आधुनिक वैद्य अन् रुग्णालयातील कर्मचारी यांना मारहाण केली, तसेच रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना छायाचित्रकात चित्रीत झाली असून मानकापूर पोलिसांनी याप्रकरणी ७-८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. शहरातील कुणाल रुग्णालयामध्ये २८ जानेवारी या दिवशी सकाळी ही घटना घडली.
राहुल ईवनाते (वय २८ वर्षे) या तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार चालू असतांनाच त्याचा मृत्यू झाला. ‘त्याचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे’, असा आरोप करत नातेवाइकांनी वरील प्रकार केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.