आदर्श निरोप समारंभ !

बिदर (कर्नाटक) येथील एका सरकारी शाळेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये नुकताच प्रसारित झाला. त्यात शाळेतील एका शिक्षकाचे अन्य जिल्ह्यातील शाळेत स्थानांतर झाल्यामुळे ते शिक्षक शाळेतील अन्य शिक्षक आणि विद्यार्थी यांचा निरोप घेतांना दिसत होते. त्यांनी शाळेच्या भूमीला हात लावून नमस्कार केला. शाळेतील अन्य शिक्षकांनाही त्यांनी वाकून (पायाला स्पर्श करून) नमस्कार केला, तेव्हा अन्य शिक्षकांनीही तशीच कृती केली. या वेळी शाळेतील सर्वच विद्यार्थी पटांगणात उपस्थित होते. कुणी शिक्षकांना हार घालून, कुणी पुष्पगुच्छ, तर कुणी भेटवस्तू देऊन हुंदके देत त्यांना वाकून नमस्कार केला. काहींनी तर त्यांना आलिंगन दिले. शिक्षक सर्वांना भेटून शाळेच्या मुख्य मार्गावर येईपर्यंत विद्यार्थी आणि अन्य सहकारी शिक्षक हमसून हमसून रडत होते. ते शिक्षक मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यावर सर्वजण मोठमोठ्याने रडू लागले. त्या शिक्षकांनाही पुष्कळ रडू आले; मात्र स्वत:ला सावरत ते तेथून परतले. सध्याच्या शिक्षकांप्रती थोडाही आदर नसणार्‍या आणि केवळ शाळेत शिकवण्यापुरता शिक्षकांशी संबंध असणार्‍या काळात शिक्षकाच्या निरोप समारंभाला एवढा जिव्हाळा अनुभवण्यास मिळणे, हे अत्यंत विरळाच उदाहरण आहे. या शिक्षकाने शाळेतील ११ वर्षांच्या कार्यकाळात खरी संपत्ती मिळवली. यातून केवळ शिक्षक-विद्यार्थी नव्हे, तर अन्य शिक्षकांसमवेतही त्यांनी आपुलकीचे संबंध निर्माण केले. विद्यार्थ्यांना शिक्षणात रस निर्माण करून त्यांना प्रेमभावाने आपलेसेही केले.

सध्याच्या निरोप समारंभांचे ‘नाच-गाणे यांचे कार्यक्रम, २-३ वाक्ये संबंधितांविषयी सांगणे, त्यानंतर खाणे-पिणे, छायाचित्रे काढणे, निरोपाचे फलक लावणे, संबंधितांना उचलून घेऊन गोंधळ घालणे’, असे स्वरूप असते. परिणामी त्यात औपचारिकता येऊन कार्यक्रमाला बीभत्स स्वरूप प्राप्त होते. बिदर येथील शिक्षकाने स्वत:च्या वर्तणुकीतून शिस्त, प्रेम, आपुलकी, आत्मीयता यांचेही धडे विद्यार्थी आणि शिक्षक यांना दिले. त्यांच्यातील नम्रता व्हिडिओत ठायी ठायी दिसून येते.

स्वत:चे वर्तन शिस्तप्रिय आणि प्रेमभावपूर्ण ठेवले, तर साहजिकच इतरांवर अन् विशेषत: देशाच्या भावी पिढीवर त्याचा परिणाम होतो, हे या शिक्षकाच्या उदाहरणातून शिकता येते. अन्यथा शिक्षकांची टिंगळटवाळी, नक्कल आणि अवमान करणारे बहुसंख्य विद्यार्थी असणार्‍या सध्याच्या पिढीत इतका पालट झाला नसता. हे शिक्षक केवळ शिक्षकांसह सर्वांसाठीच आदर्श आहेत !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.