काश्मीर आणि नागालँड येथे ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे योगदान
भारतीय सैन्याची बटालियन ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चा प्रारंभ वर्ष १९६३ मध्ये झाला. तेव्हापासून वर्ष १९७१ च्या युद्धापर्यंत ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ने विविध प्रकारे योगदान दिले, त्या योगदानाविषयी आज पहाणार आहोत. वर्ष १९६५ च्या युद्धात ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चा मोठा सहभाग होता. या बटालियनचे सैनिक वर्ष १९७१ च्या युद्धापूर्वी ईशान्य भारताच्या नागालँडमध्ये गेले होते. तेथे त्यांनी पुष्कळ चांगले काम केले होते. मराठा लाईट इन्फंट्रीचे सैनिक हे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा किंवा महाराष्ट्र-गुजरात सीमा भागांतील असतात. प्रत्येक क्षेत्रात ते पुष्कळ चांगले काम करत आहेत. सध्या ते आफ्रिकेमध्ये संयुक्त राष्ट्राच्या ‘पीस किपींग फोर्स’ (शांतता सेना)मध्येही काम करत आहेत. ‘७ मराठा’मध्ये सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन जयराम मुळीक, कर्नल भगतसिंह देशमुख, सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन वसंतराव नलावडे यांनी पुष्कळ वर्षे कर्तव्य बजावले. वर्ष १९७१ च्या युद्धाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शब्दांत ‘७ मराठा इन्फंट्री’ने दिलले योगदान जाणून घेणार आहोत.
कॅप्टन जयराम मुळीक
मी वर्ष १९६२ मध्ये बेळगाव येथे सैन्यात भरती झालो. तेव्हा ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ युनिटला प्रारंभ व्हायचा होता. १ जानेवारी १९६३ या दिवशी बेळगाव येथे कर्नल एम्.एच्.दीक्षित, सुभेदार मेजर एम्.के. गायकवाड यांच्या अखत्यारीत ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चा प्रारंभ झाला. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये गेलो. त्या वेळी मी सिंगल प्लॅटूनमध्ये (सैनिकांच्या गटामध्ये) होतो. आम्ही वर्ष १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आमची युनिट पोस्टमध्ये असल्याने आम्हाला उघडपणे आक्रमण करता आले नाही. आमचे मेजर कर्नल एच्.डब्लू. कुलकर्णी उत्तरदायी अधिकारी होते. मी त्यांच्या समवेत वायरलेस घेऊन सर्व पोस्ट (लढाईची ठिकाणे) फिरलो. लढाई संपल्यानंतर आम्ही हैदराबाद येथे आलो आणि तेथून नागालँडमध्ये गेलो. तेथे नागा लोकांनी आमच्या गाडीवर आक्रमण केले. या आक्रमणामध्ये नाईक सुभेदार सुपेकर हुतात्मा झाले. त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे एका दिवसात आम्ही नागांची २० गावे जाळून त्यांना अद्दल घडवली. त्यानंतर आम्ही कोलकाता येथे परत आलो आणि काश्मीरमध्ये परत गेलो.
कर्नल भगतसिंह देशमुख
मी ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ला वर्ष १९९० ते १९९३ कमांड (नेतृत्व) केले. मी वर्ष १९७० मध्ये प्लॅटूनमध्ये सहभागी झालो. वर्ष १९६५ मध्ये उरी येथे असतांना शत्रूला घुसखोरी करू न देण्याचे काम प्लॅटूनला देण्यात आले होते. ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ने ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे शत्रूला येण्यासाठी साधी पायवाटही मिळाली नव्हती. वर्ष १९७० च्या प्रारंभी आमची प्लॅटून हैदराबादवरून नागालँड येथे गेली. तेथे आम्ही तुंगमखोलेनसह २ चौक्या कह्यात घेतल्या. आमच्या प्लॅटूनला नागा आतंकवाद्यांना थोपवण्याचे काम देण्यात आले होते. मी पलटनमध्ये सहभागी झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये आमच्या पलटनवर पहिले आक्रमण झाले. तुंगमखोलेनपर्यंत गाड्या पोचत होत्या; म्हणून तेथे शिधा पोचवण्यासाठी ४ गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. त्या परत येत असल्याची माहिती आतंकवाद्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी तदुबी गावाजवळ घात लावला होता. या ताफ्याच्या सुरक्षेसाठी हवालदार काशीनाथ बोडके हे ‘सेकंड इन कमांड’ होते. ताफा तदुपी गावाजवळ आल्यानंतर एका वळणावर आतंकवाद्यांनी गोळीबार करणे चालू केले. या गोळीबारात पहिल्या गाडीत बसलेले नायक सुभेदार सुपेकर हुतात्मा झाले. याच वेळी हवालदार काशीनाथ बोडके शेवटच्या गाडीत होते. सर्वांनी लांब लांब गाड्या थांबवल्या आणि बाहेर उड्या मारून एकत्र आले. बोडके यांनी सैनिकांना आक्रमण करायचा आदेश दिला. त्याप्रमाणे सैनिकांनी आक्रमण केले. त्यामुळे नागांचा तथाकथित लेफ्टनंट कर्नल आणि २ सहकारी ठार झाले. सहकार्यांना एकत्र करून आक्रमण केल्याने आणि शत्रूचा गोळीबार चालू असतांनाही चांगले प्रत्युत्तर दिल्याने या योगदानासाठी हवालदार बोडके यांना ‘सेनापदक’ हा शौर्य पुरस्कार देण्यात आला.
आम्ही मावमरम येथे मुख्यालयामध्ये असतांना एका सायंकाळी बातमी मिळाली की, गावात एक आतंकवादी येऊन बढाया मारत आहे. कॅप्टन आओ साहेबांना हे समजल्यावर त्यांनी कोणतेही शस्त्र समवेत न घेता, ज्याने ही माहिती आणली होती, त्याच्या समवेत गावात गेले. कॅप्टन आओ हे स्वत: नागालँडचे होते. त्यामुळे आंतकवाद्याला त्याच्याकडे येणारा साध्या वेषातील सैन्याधिकारी समजला नाही. जेव्हा कॅप्टन आओ त्याच्या जवळ पोचले, तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कॅप्टन आओ यांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याची बंदुक काढून घेतली. त्या बंदुकीनेच त्या आतंकवाद्याला यमसदनी पाठवले. या शौर्यपूरक कार्यवाहीमुळे त्यांना शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले.
अशा प्रकारे नागालँडमध्ये अनेक घटना घडल्या. आमच्या तुकडीने पावणे दोन वर्षे बटालियनच्या क्षेत्रात शांतता राखण्याचे काम पूर्ण केले. या कार्यवाहीसाठी कमांडर लेफ्टनंट कर्नल व्हॅमतुंगा त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक देण्यात आले. अशा प्रकारे नागालँडमध्ये गौरवास्पद कारवाई झाली. त्यानंतर वर्ष १९७१ च्या युद्धासाठी तेथून पलटन पुढे गेली.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन वसंत नलावडे
मी १९६३ मध्ये या पलटनमध्ये सहभागी झालो. त्या वेळी आमचे ‘७ मराठा’ हे युनिट उरी सेक्टरमध्ये होते. जेथून शत्रूची घुसखोरी होण्याचा संभव होता. त्या वेळी आमचे मुख्याधिकारी मेजर कर्नल कुलकर्णी होते. मी ‘डेल्टा’ कंपनीत लान्सनायक म्हणून काम करत होतो. त्या वेळी माझे कंपनी कमांडर कॅप्टन जोगिंदर सिंह यांनी मला ध्येय दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी मला एका ठिकाणी सैनिकासह अर्शिअल रॉकेट लॉन्चर घेऊन जायला सांगितले. आमचे संपूर्ण युनिट बचावात्मक भूमिकेत होते. झेलम नदीच्या कडेने काही आतंकवादी, म्हणजे पाकिस्तानचे रझाकार यायचे आणि गोळीबार करून पळून जायचे. वर्ष १९६५ च्या लढाईत नद्यांवरील पूल तोडून आमच्या युनिटची रसद (मुलभूत आवश्यक साहित्य) बंद पाडण्याचा त्यांचा डाव होता; परंतु त्यांना भारतीय सैन्याचे अचूक ठिकाण कळत नव्हते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात बाँब टाकायचे, गोळीबार करत पूल तोडण्याचा प्रयत्न करत होते; पण त्यांना ते जमले नाही. लढाईच्या वेळी आमच्या पोस्टवर भूमिगत खंदके बांधण्याचे काम चालू होते. त्या वेळी आमच्या प्लॅटूनचे संपूर्ण भूमिगत खंदक आणि येण्या-जाण्याचा रस्ता बांधून घेतला होता, तसेच त्यावर छत्रही केले होते. अशा प्रकारे आमच्या युनिटने १९६५ च्या लढाईमध्ये चांगले काम केले.
आमचे युनिट उरीमध्ये असतांना त्यांनी एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्याची कमांड कॅप्टन महाडिक यांच्याकडे होती. त्यांच्या समवेत आमची एक कमांडो प्लॅटून होती. सीमेपलीकडील भागात एका बंगल्यामध्ये अनेक शत्रू सैनिक लपले होते. तेव्हा आमच्या प्लॅटूनने नियंत्रण रेषा (एल्ओसी) पार करून सर्वांना ठार केले आणि आम्ही त्यांची शस्त्रे घेऊन युनिटमध्ये परत आलो.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.