‘प्लास्टिकचे राष्ट्रध्वज’ आणि ‘तिरंगा मास्क’ यांची विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंबईत पोलीस प्रशासनाला निवेदन

काळाचौकी पोलीस ठाण्याचे फौजदार तुपे यांना निवेदन देतांना समितीचे श्री. प्रसाद मानकर

मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) – ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तरी अनुमती नसतांना संकेतस्थळांद्वारे किंवा प्रत्यक्ष जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज किंवा तिरंगा मास्क यांची विक्री करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करावेत, तसेच जे लोक, संस्था, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीची निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथील काळाचौकी, भोईवाडा आणि भायखळा पोलीस ठाणे येथे देण्यात आले.

राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली २० वर्षे राबवत आहे. या अंतर्गत या वर्षीही ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, सामाजिक माध्यमातून जागृती, फलक प्रसिद्धी आदी माध्यमांतून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेअंतर्गत प्रबोधन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून नागरिकांनी आपले राष्ट्रकर्र्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.