संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९० वर्षे) !
साधना म्हणून ‘संगीत’ जगणारे काही संगीत कलाकार !
‘गायन, वादन आणि नृत्य या ईश्वरप्राप्तीसाठी देवाने निर्मिलेल्या प्राचीन कला आहेत. कलेच्या माध्यमातून साधना करणारे स्वामी हरिदास, त्यांचे शिष्य तानसेन, पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, असे अनेक ऋषितुल्य कलाकार आजपावेतो होऊन गेले आणि त्यांच्यासारखेच अनेक चांगले कलाकार आजही समाजात आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर यांच्या समवेत साधकांनी वर्ष २०१९ मध्ये अशा अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्या.
गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांच्या भेटींतून ‘त्यांनी कठीण परिस्थितीत केलेला संगीत साधनेचा प्रवास, त्यांची संगीत साधना करण्याची तळमळ, प्रसिद्धीकडे न धावता साधना म्हणून अंगिकारलेले जीवन आणि या कलाकारांना संगीत साधना करत असतांना आलेल्या विविध अनुभूती’, यांविषयी माहिती मिळाली, तसेच त्यांचे संगीत साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शनही लाभले.
‘संगीत क्षेत्रातील सर्वांना संगीत साधनेसाठी या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा आणि त्यांनीसुद्धा संगीतकला ‘साधना’ म्हणून अंगिकारावी’, यांसाठी या गायन, वादन अन् नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांची घेतलेली मुलाखत लेखमालेच्या स्वरूपात येथे प्रसिद्ध करत आहोत. ‘यातून सर्वच कलाकारांना साधनेसाठी प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
– सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (भाग २)
पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर यांचा थोडक्यात परिचय
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर म्हणजे संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व ! पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर हे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे नातू आहेत. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर हे श्री. चिंतामणराव पलुस्कर यांचे काका आहेत. पं. गोविंदरावांचे वडील श्री. चिंतामणराव हे लहानपणापासून त्यांचे चुलत भाऊ पं. दत्तात्रेय विष्णु पलुस्कर यांच्याकडे रहायचे. ते पं. दत्तात्रेय पलुस्कर यांच्याकडेच संगीत शिकले आहेत. पं. गोविंदराव पलुस्कर यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांचे वडील श्री. चिंतामणराव पलुस्कर हेच त्यांचे संगीतातील गुरु आहेत. वडिलांप्रमाणेच पं. गोविंदराव पलुस्कर यांनीही सगळे जीवन संगीतासाठी समर्पित केले आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी त्यांची भेट घेतली. ९ जानेवारी २०२२ या दिवशीच्या दैनिकामध्ये ‘पं. पलुस्करांनी सांगितलेली संगीताविषयीची काही मौलिक सूत्रे, त्यांचा संगीत साधनेचा प्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये’ आपण वाचली. या लेखात पं. पलुस्कर यांची पत्नी सौ. शालिनी पलुस्कर आणि त्यांचे शिष्य श्री. शरद नवघरे यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पं. पलुस्कर बोलत असतांना ते जपमाळ ओढल्याप्रमाणे बोटांची हालचाल करत लय मोजत असणे आणि त्यातून त्यांचे दिवसभर संगीताशी अनुसंधान असल्याचे लक्षात येणे
‘पं. पलुस्कर यांचे बोलणे चालू असतांना दुसरीकडे त्यांचे हाताने काहीतरी मोजणे चालू असते. जपमाळ ओढल्याप्रमाणे त्यांचे सतत हातावर काहीतरी मोजणे चालू असते. पं. पलुस्कर यांच्या पत्नी म्हणाल्या, ‘‘त्यांच्या मनात अखंड संगीत चालू असते. ते दिवसभर त्याच विचारांत असतात.’’ याविषयी पं. पलुस्कर यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘ही लय आहे. मी हाताने ती लय मोजतो.’’ यावरून माझ्या लक्षात आले, ‘ते बाह्यतः बोलत असूनही अंतर्मनातून त्यांचे संगीत चालू आहे. ते बाह्यमनाने उत्तरे देत असतील, तरी त्यांचे आतून ताल, लय आणि संगीत यांच्याशी सतत अनुसंधान आहे. अशा प्रकारे त्यांची सुरांची आराधना सतत चालू आहे.’
– संकलक : सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर (वर्ष २०१९) (क्रमशः पुढच्या रविवारी)
पं. गोविंदराव पलुस्कर यांची त्यांच्या पत्नी सौ. शालिनी गोविंदराव पलुस्कर यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘पं. पलुस्कर सकाळी उठून नियमित स्वरसाधना (संगीताचा सराव) करूनच कार्यालयात जायचे.
आ. घरात आणि बाहेरही समान वागणूक असणे : अनेक कलाकारांचे वागणे बाहेर (समाजात वावरतांना किंवा कार्यक्रमांत) वेगळे असते, तर घरी त्यांचे स्वभावदोष (चिडचिडेपणा इत्यादी) दिसून येतात; मात्र पं. पलुस्करांचे असे नाही. ते घरीही तेवढ्याच प्रेमाने वागतात. बाहेर एक आणि घरी एक, असे त्यांचे वागणे नसते.
इ. नम्रता आणि अल्प अहं : पं. पलुस्करांकडे ज्ञानाचे भांडार असले, तरी त्यांच्यात विनम्रता आहे. तो त्यांचा स्वभावच आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांना जमले नाही, तर ते नम्रतेने सांगतात, ‘‘मी याचे उत्तर वाचून सांगतो.’’ तसे सांगतांना त्यांना संकोच वाटत नाही.’
– सौ. शालिनी गोविंदराव पलुस्कर (पत्नी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, नाशिक (वर्ष २०१९))
पं. गोविंदराव पलुस्कर यांची त्यांचे शिष्य श्री. शरद नवघरे यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘आम्हाला ‘गुरुजींच्या शिकवणीवर्गाला कधी जाता येईल ?’, याची ओढ लागलेली असायची.
आ. ‘चीज (टीप) कुणी लिहिली आहे ? तिच्यात कोणते भाव आहेत ?’, हे सर्व गुरुजी संक्षिप्तपणे सांगायचे.
टीप – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. त्यालाच ‘छोटा ख्याल’ किंवा ‘बंदीश’, असे म्हणतात. ही मध्य किंवा द्रुत लयीत गातात.
इ. खरोखर संगीत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना जीव ओतून शिकवणे : आम्ही शिकवणीला येतांना वेगळ्या मनःस्थितीत असायचो; मात्र शिकवणी चालू झाली की, आमचे मन पूर्णपणे एकाग्र व्हायचे. अशा प्रकारे केवळ परीक्षेवर भर न देता जे खरोखर संगीत शिकायला आले आहेत, त्यांना गुरुजी जीव ओतून शिकवायचे.
ई. गुरुजी वेळेच्या संदर्भात अत्यंत काटेकोर असून ते निश्चित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांच्याही आधी उपस्थित असतात.
उ. प्रसिद्धी आणि ज्ञान यांचा अहं नसणे : ते भारतातील प्रसिद्ध पलुस्कर घराण्यातील आहेत, तसेच त्यांना संगीताचे पुष्कळ ज्ञान आहे, तरीही ते अत्यंत साधे आहेत. त्यांना गांधर्व महाविद्यालयाकडून ‘महामहोपाध्याय’ ही उपाधीही मिळालेली आहे. याचा त्यांना यत्किंचितही अहंकार नाही.
ऊ. ‘माझ्याकडे जे ज्ञान आहे, ते कुणाला दाखवण्यासाठी नसून माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी आहे’, असे त्यांना वाटते.
ए. पलुस्कर घराणे ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित आहे; मात्र गुरुजी अन्य घराण्याचे संगीतही आवर्जून ऐकतात. ते अन्यांकडूनही शिकतात.
ऐ. वाचनाची गती अफाट असणे : जर एखादे पुस्तक वाचायला सामान्य व्यक्तींना १० ते १२ दिवस लागत असतील, तर गुरुजी ते केवळ २ दिवसांत वाचून काढतात. त्यांची वाचनाची गती कल्पनातीत आहे.
ओ. संगीत साधना केल्याने ९० व्या वर्षीही निरोगी आणि कार्यरत असणे : आज गुरुजी ९० वर्षांचे आहेत, तरीही त्यांना कोणताही आजार नाही. या वयातही कार्यरत रहाण्यामागील त्यांचे औषध, म्हणजे शास्त्रीय संगीत ! ‘संगीताचे मनन, चिंतन, संगीत शिकवणे’, हीच त्यांची साधना होय आणि हेच त्यांच्यासाठी शक्तीवर्धक आहे.
औ. पलुस्कर घराण्यात संगीत हे मनोरंजनासाठी अल्प आणि भक्तीप्रधान अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक सूर गातांना त्यात आर्त भक्तीच जाणवते. सर्व जण देवासाठीच गातात.’
– श्री. शरद नवघरे, नाशिक (वर्ष २०१९)