‘शक्ती’ कायद्याच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती !

आमदार सौ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर – ‘शक्ती’ कायद्याखालील महिला आणि बालक यांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक २०२० यावरील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २८ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठे यांनी केली. ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा’, अशी सर्वप्रथम मागणी आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांनीच विधानसभेत केली होती. या मागणीची नोंद घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायदा समजून घेण्यासाठी आंध्रप्रदेशचा दौरा केला होता. त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होणार आहे. या माध्यमातून महिलांना त्वरित न्याय मिळून त्यांच्या तक्रारींचा निर्वाळा होण्यास गती मिळणार आहे. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, यासाठी शक्ती कायद्याची मागणी सातत्याने होत होती.

वर्धा येथील जळीतकांड प्रकरणानंतर सौ. धानोरकर यांनी विधानसभेत या कायद्याची मागणी लावून धरली, तसेच पाठपुरावाही केला. प्रतिभा धानोरकर यांच्या कार्याची नोंद घेत विधान परिषद आणि विधानसभेच्या दोन्ही सभागृहांनी गठीत केलेल्या समितीवर त्यांची निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.