नवज्योतसिंह सिद्धू यांनी पैशांसाठी स्वतःच्या वृद्ध आईला घराबाहेर काढले होते ! – सिद्धू यांच्या बहिणीचाच आरोप

नवज्योतसिंह सिद्धू आणि त्यांची मोठी बहीण सुमन तूर

चंडीगड – पंजाब राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी स्वतःच्या वृद्ध आईला पैशांसाठी घराबाहेर काढले होते, असा आरोप सिद्धू यांची मोठी बहीण सुमन तूर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला आहे. सुमन तूर अमेरिकेत वास्तव्यास असतात. सध्या त्या भारतात आल्या आहेत.

सुमन तूर पुढे म्हणाल्या, ‘‘वडिलांच्या मृत्यूनंतर वर्ष १९८६ मध्ये सिद्धू यांनी मला आणि आईला बाहेर काढले. वर्ष १९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर माझ्या आईचा मृत्यू झाला. तत्पूर्वी माझी आई ४ मास रुग्णालयात होती. मी जे काही सांगत आहे त्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. संपत्तीसाठी सिद्धू यांनी माझ्याशी सर्व संबंध तोडले. माझ्या वडिलांनी घर, भूमी अशी संपत्ती मागे सोडली होती.

मी आता ७० वर्षांची आहे आणि या वेळी कुटुंबाविषयी अशा गोष्टींचा खुलासा करणे माझ्यासाठी फार अवघड आहे.’’ सिद्धू यांच्या वडिलांचे २ विवाह झाले होते, असे सांगितले जाते.