पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले अनुभव !

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले अनुभव !

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) (पूर्वाश्रमीच्या कु. सुधा नेने) या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आत्याची (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांची) मुलगी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आतेबहीण आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संमोहनशास्त्र आणि त्यांची सर्वज्ञता यांविषयी त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.

(भाग १)

श्रीमती अनुपमा देशमुख

१. बालपण

१ अ. बालपण एकत्र कुटुंबपद्धतीत जाणे : ‘माझ्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव किंवा त्या दिशेने माझी वाटचाल नक्की कशी आणि केव्हा चालू झाली ?’, हे मला आठवत नाही. आमच्याकडे आमचे १२ जणांचे एकत्र कुटुंब होते. माझे आई-वडील, आम्ही ३ भावंडे, मोठे काका, काकू आणि त्यांची ३ मुले, तसेच आजी-आजोबा असे आम्ही १२ जण होतो. या समवेत घरात येणारे पाहुणे भरपूर असत.

१ आ. आजी-आजोबांनी लहानपणी केलेले साधनेचे संस्कार

१ आ १. आजोबांनी विविध स्तोत्रे म्हणवून घेणे : आम्ही पुण्याला प्रभात रोडला रहात होतो. त्या वेळी आमचे आजोबा ती. हरि त्रिंबक नेने, त्यांना आम्ही ‘भाऊ’ म्हणायचो. प्रतिदिन संध्याकाळी आम्ही खेळून आल्यावर ते आम्हा ६ भावंडांना त्यांच्या खोलीत बसवत. ते आमच्याकडून शुभंकरोती, रामरक्षा, तसेच दासबोधातील आणि गीतेतील काही श्लोक म्हणून घेत असत. ते सर्व म्हणत असतांना ‘आमच्या मनात देवाप्रती भाव किती असायचा कुणास ठाऊक ?’; पण भाऊंच्या घार्‍या डोळ्यांच्या धाकात आम्ही ते सर्व गंभीरपणे म्हणत असू.

१ आ २. आजीमुळे देवळात जाऊन जप करण्याची सवय लागणे : आमची आजी, तिला आम्ही ‘आई’ म्हणायचो, ती आम्हाला जवळच्या एका देवळात अधून-मधून नेत असे. पुण्याच्या त्या थंडीतही आम्ही तिच्या समवेत काकड आरतीला पहाटे ५ वाजता जायचो. अलीकडची मुले जशी ‘मी येणार नाही. मला कंटाळा येतो’, असे सहजपणे सांगतात, तसे म्हणायची आमची प्राज्ञा (धैर्य) नव्हती. एकदा त्या देवळात नियमित येणार्‍या सर्व बायकांनी मिळून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप १ कोटी वेळा करण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी तिने आम्हा नातवंडांनाही नामजपाला बसवले. आम्ही सर्व जण एकत्र बसून जप करायचो. जप किती झाला, ते मोजण्यासाठी वाल आणि शेंगदाणे वाट्यांमध्ये ठेवलेले असायचे. ‘१० वेळा जप झाला की एक वाल बाजूला ठेवायचो, असे १० वाल म्हणजे १०० वेळा जप झाला की १ शेंगदाणा ठेवायचो’, अशा प्रकारे आम्ही त्यांच्या समवेत नियमित नामजपाला बसून तो संकल्प पूर्ण झाला.

२. लग्नापूर्वीचे आनंदी आणि समाधानी आयुष्य !

२ अ. वडील चित्रपट आणि नाट्य सृष्टींतील असूनही खेळकर स्वभावाचे असल्याने घरी आनंदी अन् समाधानी वातावरण असणे : माझे लग्नापूर्वीचे आयुष्य पुष्कळ चांगले गेले. माझे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते राजा नेने हे पुष्कळ आनंदी अन् खेळकर स्वभावाचे होते. त्यामुळे आमच्या घरात कायम हास्याची कारंजी उसळत असायची. त्यांच्या सिनेनाट्यसृष्टीतील गाणी आणि घडलेले प्रसंग यांच्या अनेक आठवणी ते सांगायचे. या सृष्टीत कधी दिवाळी, तर कधी शिमगा (म्हणजे कधी पुष्कळ काम, तर कधी काहीच नाही.) अशी अवस्था असते; कारण नेहमी काम मिळत राहील, याची निश्चिती नसते. त्यातच माझ्या वडिलांनी निर्मिती केलेले ३ – ४ चित्रपट चालले नाहीत. त्यात कमालीची हानी झाली; पण तरीही आमच्या घरातल्या आनंदावर त्याचे फारसे सावट आले नाही; कारण आमच्या गरजा अल्प होत्या आणि वृत्ती समाधानी होती. यात माझ्या आईचाही मोठा वाटा आहे.

२ आ. व्यावसायिक रंगभूमीत झालेले पदार्पण : मला अभिनय आणि संगीत-नृत्याची आवड होती. माझी ती आवड शाळा आणि महाविद्यालय यांच्या कार्यक्रमांत भाग घेऊन पूर्ण झाली. माझ्या वडिलांनी पु.ल. देशपांडेंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात ‘गीता’चे काम करण्याची संधी मला दिली. त्यातील ‘काकाजी’च्या भूमिकेत त्यांचा हातखंडा होता. त्यांची धाकटी बहीण आणि मेहुणे हे जोडपेही त्यात भूमिका करायचे. त्या वेळी या नाटकामुळे व्यावसायिक रंगभूमीवर डॉ. काशीनाथ घाणेकर, सीमा रमेश देव, उषाकिरण, सूर्यकांत, बाबूराव गोखले, डॉ. गिरीश ओक, शीला गुप्ते, कुमार दिघे, राजा परांजपे, श्रीकांत मोघे, शुभा खोटे अशा दिग्गज कलावंतांच्या समवेत काम करण्याची मला संधी नव्हे, भाग्यच लाभले. मी ‘ज्युनिअर बी.ए.’ला असतांना वडिलांच्या दिग्दर्शनाखाली ‘तुका झालासे कळस’ या चित्रपटात कुमार दिघे आणि ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचनाबाई (सुलोचना लाटकर) यांच्या समवेत एक छोटीशी इंद्रायणीदेवीची भूमिका केली. या भूमिकेत देवी पाण्यातून वर येऊन संत तुकाराम महाराजांना त्यांच्या बुडवलेल्या गाथा परत देते.

आम्ही नाटकांच्या दौर्‍यावरही जात होतो. एकीकडे महाविद्यालय शिक्षण चालू होतेच. त्यातही स्पर्धांमध्ये भाग घेणे, नृत्य, एकांकिका आणि नाटक यांचे दिग्दर्शन करणे, महाविद्यालयातील सरचिटणीस (‘जनरल सेक्रेटरी’चे) पद सांभाळणे, हे करूनही मला बी.ए.च्या परीक्षेत घवघवीत यश मिळाले. मानसशास्त्र या विषयात मी विद्यापिठात पहिली आले आणि मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती (नॅशनल स्कॉलरशिप) मिळाली.

३. वडिलांचा निरीश्वरवाद आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने चालू झालेली साधना

३ अ. वडील राजा नेने हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते असून निरीश्वरवादी असणे : आजी-आजोबा होते, तोपर्यंत नकळत थोडा पुण्यसंचय झाला. पुढे माझे वडील राजा नेने पूर्णपणे निरीश्वरवादी असल्याने त्यात खंड पडला. ते एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट-नाट्य अभिनेते होते. त्यांचे म्हणणे असे होते की, ‘देव असतांना कित्येक लोकांना जन्मभर दुःख आणि कष्ट यांत पिचत रहावे का लागते ? त्यांना पूर्वसंचित, प्रारब्धभोग हे मान्य नव्हते.’ ते म्हणायचे, ‘देव माणसापेक्षा कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे, तर त्याने सर्वच माणसांना चांगले वागण्याची बुद्धी द्यायला हवी, म्हणजे सर्वांचीच कर्मे चांगली आणि शुद्ध होऊन सगळेच आनंदात रहातील. आपण सर्वजण देवाचीच लेकरे आहोत, तर तो अनेक लोकांना इतके दुःख भोगायला का लावतो ?’ नाटकात काम करतांनाच त्यांनी केवळ काही वेळा देवापुढे हात जोडले होते. तसेच ‘देव आहे बरं ! त्याची उपासना करा’, अशी देवाविषयीची वाक्ये बोलतांना ते जवळ उभ्या असलेल्या सहकलाकारांना केवळ ऐकू जाईल, इतक्या हळू आवाजात ‘सगळे खोटे, सगळे खोटे’, असे म्हणत.

३ आ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याशी असलेले नाते आणि चालू झालेली साधना : पुढे आमच्या भाग्याने मला आणि आईला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची शिकवण अन् सहवास यांचा लाभ मिळाला आणि आमची परमेश्वराची उपासना चालू झाली. तेव्हा माझ्या वडिलांची नास्तिक मते आठवून मला पुष्कळ काळजी वाटली होती. याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलले असता ते म्हणाले, ‘‘अशी काळजी करू नका; कारण ते मनाने चांगले होते. अनेकांना त्यांनी संकटात साहाय्य केले आहे. ते जन्मभर सत्याने वागले. काही जण ‘सत्य हाच ईश्वर आहे’, असे मानतात.’’ या ठिकाणी अभिमानाने सांगावेसे वाटते की, परात्पर गुरु डॉक्टरांचे आणि आमचे जवळचे नाते आहे. माझ्या आईचे वडील (माझे आजोबा) आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या वडिलांच्या आई (डॉक्टरांची आजी) हे सख्खे बहीण-भाऊ आहेत. त्यामुळे माझी आई पू. शालिनी नेने ही डॉक्टरांची आत्या आणि ते माझे मामेभाऊ लागतात. आरंभी आमच्या नेने-आठवले कुटुंबियांचे पुष्कळ जाणे-येणे होते. त्यामुळे जन्मानेच मला हे भाग्य लाभले.

३ इ. आईने धर्माचरण चालूच ठेवणे : माझ्या वडिलांनी माझ्या आईला देवधर्म पाळण्यास कधी विरोध केला नाही. देवपूजा, व्यंकटेशस्तोत्रासारखी स्तोत्रे म्हणणे, वडिलांच्या एका मोठ्या आजारपणात संकष्टी चतुर्थीचे उपवास करणे इत्यादी सर्व ती मनोभावे करत असे. मी बर्‍याच वेळा कर्वे रोडच्या दशभुजा गणपतीच्या देवळात दर्शनासाठी जात असे; पण त्या वेळी मला नामजपाचे माहात्म्य कळले नव्हते.

(क्रमशः उद्याच्या अंकात)

– श्रीमती अनुपमा देशमुख (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने आणि कै. राजा नेने यांच्या कन्या), पुणे (१६.१.२०२२)


‘पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना विवाहोत्तर जीवनात आलेले काही अनुभव !’
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/548566.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक