अंनिसवाल्यांची भोंदूगिरी !
संपादकीय
अंतर्गत कुरघोडीने ग्रासलेले अंनिसवाले समाजाला विवेक शिकवू शकतील का ?
समाजातील भोंदूगिरी बाहेर काढायला निघालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधीलच भोंदूगिरी चव्हाट्यावर आली आहे. ७ कोटी रुपयांची मालमत्ता असलेला अंनिसचा ट्रस्ट कह्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी अंनिसचे दिवंगत कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या मुलांनाच भोंदू ठरवले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच अंनिसमधील अंतर्गत कुरघोडी चालू झाल्या होत्या. यापूर्वी हे सर्व दबक्या आवाजात होते; आता मात्र अविनाश पाटील यांनी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून डॉ. दाभोलकर यांची मुले हमीद आणि मुक्ता यांच्यावर थेट आरोप केले आहेत. यावरून हे वाद किती टोकाला गेले आहेत, याची कल्पना येते. घराणेशाहीचा आरोप करून ‘दाभोलकर कुटुंबीय अंनिस बळकावण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप अविनाश पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय आणि अस्तित्वात असलेले मुख्य विश्वस्त यांच्याकडून अविनाश पाटील यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. स्वतःला डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अविनाश पाटील यांनी अंनिसमधील स्वत:च्या समर्थकांची जमवाजमव करून स्वत:ची वेगळी यंत्रणा निर्माण केली आहे. अंनिसचे मासिक असतांना त्यांनी स्वत:चे वेगळे मासिक चालू केले आहे. अंनिसच्या कार्यासाठी येणारा निधी हा दाभोलकर कुटुंबियांचे वर्चस्व असलेल्या ट्रस्टच्या नावे जात असल्याचे लक्षात आल्यावर अविनाश पाटील यांनी स्वतंत्र ‘विवेक जागर’ नावाची संस्था चालू केली आहे. अंनिसमधील विकोपाला गेलेल्या या कुरघोडी पहाता ही मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करत आहेत ? कि स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ? असा प्रश्न पडतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली चालू असलेल्या या भोंदूगिरीला समाजाने वेळीच ओळखायला हवे.
भक्तीमार्गालाच अंधश्रद्धा ठरवणारे भोंदू !
मुळात अंनिसच भोंदू आहे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली ही भोंदूगिरी खपवली. संतांनी समाजाला अध्यात्माची शिकवण देतांना भोंदूगिरीचेही दाखले वेळोवेळी दिले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ‘ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख । डोळे झाकोनी करती पाप । तुका म्हणे सांगो किती । जळो तयाची संगती’, अशा प्रकारे भोंदूगिरीवर प्रहार केला आहे. संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग अंनिसवाले नेहमीच सोयीनुसार वापरतात; मात्र त्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची उपासना केली, भक्तीमार्गाची शिकवण दिली, त्याचा अंगीकार अंनिसवाले कधीही करत नाहीत. उलट संतांच्या अभंगांचा सोयीनुसार वापर करून अंनिसवाल्यांनी भगवंताच्या भक्तीलाच ‘अंधश्रद्धा’ ठरवून समाजाला अध्यात्म मार्गावरून परावृत्त करण्याचे पाप केले. अशा करंट्यांना कुणी समाजसुधारक म्हणून का गौरवावे ? डॉ. दाभोलकर यांनीही आयुष्यभर अशाच प्रकारे सर्वसामान्यांना संभ्रमित केले. हीच अंनिसची भोंदूगिरी होय.
पैसा आणि मानसन्मान यांच्यासाठी कुरघोडी !
अंनिसचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा हेतू हा कधीच शुद्ध नव्हता. अंनिसला खरोखरच अंधश्रद्धा निर्मूलन करायची असती, तर त्यांनी प्रथम ‘श्रद्धा’ म्हणजे काय ? तिचे अध्यात्मातील महत्त्व काय ? हे समजून घेतले असते. समाजातील प्रत्येक क्षेत्रात अपप्रवृत्ती आहे, तशी अध्यात्मक्षेत्रातही आहे. अनेक भोंदूबाबा, मांत्रिक पैशासाठी भाविकांची फसवणूक करतात; मात्र समाजात जसे भोंदूबाबा आहेत, तसे त्यागी जीवन जगणारे संतमहात्मेही आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य साधना केल्यास ‘श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’ म्हणजे काय ? याचे ज्ञान होते. संतांनी स्वत: साधना करून त्यानंतर ‘अंधश्रद्धा निर्मूलनाची शिकवण समाजाला दिली, हे अंनिसवाले विसरून संतांचे अभंग सोयीनुसार वापरतात. असे अंनिसवाले समाजातील भोंदूगिरी कशी काय दूर करणार ?
यापूर्वी सनातन संस्थेने अंनिसमधील आर्थिक अपहार पुराव्यासह समोर आणला आहे. परदेशातून डॉ. दाभोलकर यांच्या नावे आलेल्या देणग्यांची न्यासाच्या हिशोबात नोंद नसणे, स्थावर आणि जंगम मालमत्ता यांच्या अद्ययावत नोंदी न ठेवणे, खरेदी केलेल्या वाहनाविषयी ठराव नसणे आदी अनेक आर्थिक अनियमितता सनातन संस्थेने धर्मादाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर अविनाश पाटील यांनीही ट्रस्टच्या हिशोबात तांत्रिक त्रुटी असल्याचे मान्य केले आहे; मात्र ‘डॉ. दाभोलकर हयात असतांना ट्रस्टचा सर्व व्यवहार तेच पहात होते. ट्रस्टला मिळणार्या देणग्यांविषयी मला काहीच माहिती नव्हते’, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. स्वत:चे हात वर करून अविनाश पाटील यांनी ट्रस्टमधील अनियमिततेला डॉ. दाभोलकर हेच उत्तरदायी असल्याचेच यातून सांगितले आहे. एकूणच काय, तर अंनिसचा सर्व व्यवहारच संशयास्पद आहे. हमीद आणि मुक्ता दाभोलकर अंनिस ट्रस्ट कह्यात घेऊन त्याचे धन बळकावत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप अविनाश पाटील यांनी केला आहे. यापूर्वी श्याम मानव यांनी अंनिसमधून बाहेर पडून ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ स्थापन केली आहे. आता अंनिस दुसर्या फुटीच्या उंबरठ्यावर असून याची केवळ औपचारिकताच शेष आहे. अनेक विचारांचे लोक एका ध्येयाने प्रेरित होऊन संघटना चालवत असतात. त्यामुळे त्यामध्ये वैचारिक मतभेद असणे हे स्वाभाविक असते; मात्र ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, हे घोषवाक्य असलेल्या अंनिसवाल्यांचे मतभेद हे वैचारिक नसून आर्थिक, मानसन्मान, प्रतिष्ठा अशा स्वार्थामध्ये गुंतलेले आहेत. अशा कुरघोडीत गुंतलेली आणि पैशासाठी हपापलेली भोंदू मंडळी समाजाला भोंदूगिरीतून बाहेर काढतील का ? हाच मोठा प्रश्न आहे.