प्रजासत्ताकदिनानिमित्त देहलीच्या विजय चौकामध्ये ‘बीटिंग द रिट्रीट’ कार्यक्रम सादर

१ सहस्र ड्रोन्सद्वारे आकाशात विविध चित्रांचे प्रदर्शन

ड्रोन्सद्वारे आकाशात विविध चित्रांचे प्रदर्शन

नवी देहली – प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही २९ जानेवारी या दिवशी येथील विजय चौकामध्ये ‘बीटिंग द रिट्रीट’ हा सैन्याच्या बँडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री, तसेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आदी उपस्थित होते. या वेळी १ सहस्र ड्रोन्सच्या साहाय्याने आकाशामध्ये विविध चित्रे बनवण्यात आली.

यावर्षी ‘अबाइड विथ मी’ (माझ्यासमवेत रहा) ही धुन यातून वगळण्यात आली. ही म. गांधी यांच्या आवडीची धुन होती, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येऊन यावर टीका करण्यात आली. ही धुन स्कॉटलँडच्या कवी हेनरी फ्रांसिस लाइट यांनी वर्ष १८४७ मध्ये बनवली होती आणि वर्ष १९५० पासून या कार्यक्रमात वाजवण्यात येत होती. (एका विदेशी कवीची धून भारतात इतकी वर्षे चालू ठेवण्यात येणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक)

सौजन्य : Doordarshan National

‘बीटिंग द रिट्रीट’ म्हणजे काय ?

‘बीटिंग द रिट्रीट’ अनेक दशकांपासून असलेली सैनिकी पद्धत आहे. यामध्ये सैनिक सूर्यास्ताच्या वेळी बिगुल वाजवून युद्ध समाप्तीची घोषणा केली जाते. या वेळी ड्रमच्या संगीतामध्ये ध्वज खाली उतरवला जातो. यानंतर सैनिक युद्ध थांबवून त्यांच्या छावणीमध्ये जातात. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘बीटिंग द रिट्रीट’ या कार्यक्रमामध्ये सैन्यदल, नौदल, वायूदल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांचे बँडपथक सहभागी होतात. यावेळी एकूण २६ धुनी वाजवल्या जातात.