भारत सरकारने इस्रायलकडून खरेदी केले हेरगिरी करणारे ‘पेगासस’ सॉफ्टवेअर ! – न्यूयॉर्क टाइम्सचा थयथयाट
वर्ष २०१७ मध्ये १५ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण कराराच्या अंतर्गत केलेल्या खरेदीत ‘पेगासस’चा समावेश !
न्यूयॉर्क टाइम्सचा भारतद्वेष उघड आहे. असे असले, तरी याविषयी केंद्र सरकारने सरकारला सत्य सांगून आश्वस्त करायला हवे, असेच जनतेला वाटते ! – संपादक
नवी देहली – ‘भारतातील भाजप सरकारने वर्ष २०१७ मध्ये इस्रायलचे आस्थापन ‘एन्.एस्.ओ. ग्रूप’कडून ‘स्पाय सॉफ्टवेअर’ (हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर) असलेले ‘पेगासस’ विकत घेतले होते. हे त्या वेळी १५ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण करारात विकत घेण्यात आले होते. या संरक्षण करारात भारताने क्षेपणास्त्र प्रणाली आणि काही शस्त्रास्त्रेही खरेदी केली होती’, असा दावा करणारे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’नेही (‘एफ्.बी.आय.’नेही) हे सॉफ्टवेअर विकत घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. जगभरात या ‘स्पायवेअर’चा (हेरगिरी करू शकणार्या प्रणालीचा) वापर कसा केला गेला, याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने पोलंड, हंगरी, मेक्सिको, भारत अशा अनेक देशांमध्ये पेगाससच्या वापरास मान्यता दिली होती. आतापर्यंत भारत किंवा इस्रायल यांच्यापैकी कुणीही ‘पेगासस’ खरेदीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही किंवा तो फेटाळलेलाही नाही.
#India bought controversial Israeli spyware #Pegasus as part of USD 2-billion arms deal in 2017: NYT#Israelhttps://t.co/FVmjxxLmFc
— TIMES NOW (@TimesNow) January 29, 2022
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०१७ मध्ये इस्रायलला गेले होते. इस्रायलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते. या वेळी त्यांच्यात हा १५ सहस्र कोटी रुपयांचा करार झाला होता आणि त्यात पेगाससही होते.
२. जगभरातील अनेक सरकारांनी विरोधक आणि पत्रकार यांची हेरगिरी करण्यासाठी स्पायवेअरचा वापर केल्याचे जुलै २०२१ मध्ये समोर आले होते. भारतातही काँग्रेसी नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तत्कालीन निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह ४० हून अधिक पत्रकारांची भारतात हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
३. विदेशात मेक्सिकोच्या सरकारने याचा वापर पत्रकार आणि विरोधक यांच्या विरोधात केला, तर सौदी अरेबियाने पत्रकार जमाल खशोगी अन् राजघराण्यावर टीका करणार्या त्याच्या सहकार्यांविरुद्ध याचा वापर केला.
४. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पेगासस हेरगिरीच्या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी, या मागणीसाठी ५ ऑगस्ट २०२१ या दिवशी काही याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांची सामूहिक सुनावणी करतांना न्यायालयाने तज्ञांच्या समितीकडून अन्वेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
५. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या या अहवालावर केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी टीका केली असून त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला ‘सुपारी मिडीया’ (पैसे घेऊन पत्रकारिता करणारे प्रसारमाध्यम) म्हटले आहे.
‘पेगासस’ काय आहे ?
‘पेगासस’ एक ‘स्पायवेअर’ आहे. ‘स्पायवेअर’ म्हणजे ‘हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर’ ! याद्वारे कोणताही भ्रमणभाष हॅक केला जाऊ शकतो (नियंत्रण मिळवले जाऊ शकते). हॅक केल्यानंतर त्या भ्रमणभाषचा कॅमेरा, माईक, संदेश आणि कॉल्स यांसह सर्व माहिती हॅकरकडे (नियंत्रकाकडे) जाते. हे स्पायवेअर इस्रायलचे आस्थापन एन्.एस्.ओ. ग्रूपने बनवले आहे.