तारापूर (जिल्हा ठाणे) येथे गोहत्या करणार्‍या कसायांकडून पोलिसांवर सशस्त्र आक्रमण, ३ पोलीस कर्मचारी घायाळ

  • गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे सरकारला लज्जास्पद ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक 
  • अनेकदा गोतस्कर सशस्त्र आक्रमण करतात, हे माहीत असूनही अधिक सशस्त्र कुमक घेऊन जायला पाहिजे एवढेही साधे पोलिसांना लक्षात कसे येत नाही ? – संपादक 

नालासोपारा, २८ जानेवारी (वार्ता.) – तारापूर येथे गोहत्या करणार्‍या कसायांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर या कसायांनी सशस्त्र आक्रमण केल्याची घटना २६ जानेवारी या दिवशी घडली. यामध्ये ३ पोलीस कर्मचारी घायाळ झाले असून ३ कसायांना अटक करण्यात आली आहे. अन्य फरार कसायांचा पोलीस शोध घेत आहेत.

साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना बजरंग दलाचे पालघर जिल्हा संयोजक चंदन सिंह यांनी माहिती दिली होती की, तारापूर येथील अन्सारी दमणवाला हा चोरून आणलेल्या गायी आणि गोवंश महंमद जोहेर शेख याच्या घराजवळील गोठ्यात कापण्यासाठी आणणार आहे. त्यानुसार जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाड टाकली. या वेळी तेथे गायी आणि गोवंशीय यांना कापण्याचे काम चालू होते. पोलिसांना पहाताच अन्सारी याने त्यांना चाकू आणि सुरा यांचा धाक दाखवून ‘येथून निघून जा नाहीतर जिवे ठार मारू’, अशी धमकी दिली. त्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अन्सारी याने अगोदरच दबा धरून बसलेल्या सहकार्‍यांना बोलावून पोलिसांवर सशस्त्र आक्रमण केले आणि नंतर ते पळून गेले. यामध्ये योगेश जाधव, पोलीस हवालदार रमेश हाडळ आणि अन्य एक कर्मचारी घायाळ झाले. घायाळ स्थितीतही पोलिसांनी ३ जणांना अटक केली. अन्य १२ कसायांचा पोलीस शोध घेत आहेत. या ठिकाणच्या ९ गायी आणि वासरे यांची सुटका केली.

या प्रकरणी तारापूर पाच मार्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.