प्रतिदिन सकाळी सामूहिक राष्ट्रगीत झाल्यानंतरच सर्व व्यवहार चालू करणारे भिलवडी (जिल्हा सांगली) येथील व्यापारी आणि ग्रामस्थ !
इतरांनी आदर्श घ्यावा, असे भिलवडी गाव ! – संपादक
भिलवडी (जिल्हा सांगली), २८ जानेवारी (वार्ता.) – भिलवडी या गावात प्रतिदिन सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी राष्ट्रगीत लावण्यात येते. राष्ट्रगीतासाठी सगळे ग्रामस्थ-व्यापारी एकत्र येतात आणि राष्ट्रगीत पूर्ण झाल्यानंतरच व्यापारी त्यांची दुकाने चालू करतात. या संदर्भात तेथील एक व्यापारी श्री. दीपक पाटील म्हणाले, ‘‘१५ ऑगस्ट २०२० या दिवशी आमच्या भिलवडी व्यापारी संघटनेची स्थापना झाली. राष्ट्रगीताच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि नव्या पिढीला ऊर्जा मिळावी, या उद्देशाने स्थापनेच्या दिवसापासून आम्ही राष्ट्रगीत चालू केले आहे. हा उपक्रम ग्रामस्थ आणि व्यापारी यांच्याकडून अखंडीतपणे चालू ठेवण्याचा मानस आहे.’’ (देशाप्रती आदर दाखवत राष्ट्रगीतानंतरच सर्व व्यवहार चालू करणारे भिलवडी ग्रामस्थ आणि व्यापारी इतरांसाठी आदर्शच आहेत ! – संपादक) सकाळी दुकानदार गावात येतात आणि राष्ट्रगीत पूर्ण झाल्यावरच त्यांचे व्यवहार चालू करतात. या संदर्भात एक व्यापारी म्हणाले, ‘‘महापुरानंतर सगळ्या व्यापार्यांना परत एकदा उभे रहाण्याची ऊर्जा ही राष्ट्रगीताच्या माध्यमातूनच मिळाली. त्यामुळे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’’