नाशिक येथे महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीत मृत्यू !
नाशिक – येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे-जाधव यांचा चारचाकी वाहनामध्ये जळून मृत्यू झाला आहे. वाजे या मोरवाडी रुग्णालयात कार्यरत होत्या. वाडीवर्हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात कि अपघात ? याचे अन्वेषण पोलिसांनी चालू केले आहे. २५ जानेवारीच्या रात्री मिलिट्री प्रवेशद्वारासमोर जळलेल्या अवस्थेत त्यांचे वाहन सापडले आहे.
डॉ. सुवर्णा वाजे-जाधव गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. शहरात वेगाने गुन्हेगारी वाढली आहे. एकाच आठवड्यात ३ खून झालेले आहेत; मात्र आता चक्क एका महिला अधिकार्याचा मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
डॉ. सुवर्णा यांनी २५ जानेवारीच्या रात्री पतींना ‘रात्री ११ वाजेपर्यंत एक बैठक असल्याने मला यायला विलंब होईल’, असा संदेश पाठवला होता. त्यानंतर त्या परतल्या नाहीत. त्यांचे पती आणि वडील यांनी महापालिकेतल्या अधिकार्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना रात्री कोणतीही बैठक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबाने डॉ. सुवर्णा वाजे यांचा शोध चालू केला.
डॉ. सुवर्णा वाजे-जाधव कर्तबगार अधिकारी अशी ख्याती !डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली होती. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप त्यांनी पाडली. त्यामुळे महापालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही ताण नव्हता. |