पू. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी सेवक, वाहनचालक आणि काळजीवाहू सेविका यांना ६ वर्षांचा कारावास !
इंदूर (मध्यप्रदेश) – पू. भय्यूजी महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी इंदूर न्यायालयाने पू. महाराजांचा सेवक विनायक दुधाळे, वाहनचालक शरद देशमुख आणि केअर टेकर (काळजीवाहू सेविका) पलक यांना पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवले आहे. या तिघांना ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोषी ठरवण्यात आलेली पलक या तरुणीने पू. भय्यू महाराजांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. वर्ष २०१८ मध्ये पू. भय्यू महाराज यांनी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली होती. प्रारंभी कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी काही मास आधीच त्यांनी ‘सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून मी आता निवृत्त होत आहे’, असे घोषित केले होते.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सेवक, चालक, केअर टेकर दोषी; इंदूर कोर्टाचा निकाल https://t.co/1atKhlCJKT
— Lokmat (@lokmat) January 28, 2022
पू. भय्यूजी महाराज यांची माहितीपू. भय्यूजी महाराज इंदूर येथील होते. देशभरातील राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेते पू. भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. देवेंद्र फडणवीस, विलासराव देशमुख आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे त्यांच्याकडे चर्चेसाठी जात असत. महाराष्ट्रातील आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या मुलांसाठी पू. भय्यूजी महाराज यांनी मोठे काम केले. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने ५०० तलाव खोदले आहेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते काहीही भेटवस्तू स्वीकारत नसत. त्याऐवजी ‘एक झाड लावा’, असे ते सांगत. |