उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार !

जिल्हाध्यक्ष शोषण करत असल्याचा आरोप

काँग्रेसचे अध्यक्षपद एका महिलेकडे आहे, उत्तरप्रदेशातील प्रमुखपद महिलेकडे आहे. असे असतांना पक्षामध्ये महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपात तथ्य असेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का ? – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील शेखुपूर मतदारसंघातील काँग्रेसच्या महिला उमेदवार फराह नईम यांनी ‘काँग्रेसमध्ये महिलांचे शोषण होत आहे’, असा आरोप करत विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. पक्षाचे बदायूचे जिल्हाध्यक्ष ओमकार सिंह यांच्यावर आरोप करत त्यांनी हा नकार दिला आहे. सिंह यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. याविषयीचे पत्र त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांना पाठवले आहे.

फराह नईम यांनी प्रियांका वाड्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बदायूच्या संघटनेमध्ये महिला सुरक्षित नाहीत. जिल्हाध्यक्ष ओमकार सिंह ‘मुसलमान महिलांना तिकीट देऊ नये’, असे म्हणत आहेत. मी चारित्र्यहीन असल्याचे आरोप करण्यात आला आहे. माझ्यावर अनेक घाणेरडे आरोप करण्यात आले आहेत. मी काँग्रेसची सेवा केली; पण त्यांनी माझ्यावर असे आरोप केले. याचे पुष्कळवाईट वाटते. ओमकार सिंह हे बोलतांना अनेकदा अश्‍लील शब्द वापरतात. ओमकार सिंह यांनी माझे तिकीट कापण्यासाठी बर्‍याचदा प्रयत्न केले.