‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब घालण्याची मागणी करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

मुसलमान विद्यार्थिनी धर्माच्या संदर्भातील परंपरा पाळण्यासाठी न्यायालयापर्यंध धाव घेतात, तर कॉन्व्हेंट शाळेत कुंकू, बिंदी, बांगड्या काढण्यास सांगितल्यावर हिंदू विद्यार्थिनी ते निमूटपणे काढून येशूची प्रार्थना करतात ! – संपादक

थिरुवनंतपूरम् (केरळ) – येथील एका शाळेतील मुसलमान विद्यार्थिनीने ‘इस्लाममध्ये महिला आणि मुली यांना हिजाब घालून बाहेर जाणे अनिवार्य आहे’, असे सांगत ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती; मात्र ‘यामुळे धर्मनिरपेक्षता प्रभावित होईल’, असे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यानंतर विद्यार्थिनीने सरकारकडे अनुमती मागितली; मात्र सरकारनेही तिची मागणी अमान्य केली. ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ ही केरळ सरकारने शालेय स्तरावरील मुला-मुलींच्या विकासासाठीची राबवलेली योजना आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, आदर आणि शिस्त निर्माण होऊन लोकशाही समाजाचे भावी नेते म्हणून विकसित होण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे कार्य याद्वारे केले जाते.

१. सरकारने अनुमती नाकारतांना म्हटले, ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’चे कार्य पहाता विद्यार्थिनीच्या या मागणीचा विचारही केला जाऊ शकत नाही. विद्यार्थिनीच्या या मागणीवर विचार करून निर्णय घेतल्यास आगामी काळात अन्य दलांच्या संदर्भातही अशी मागणी होऊ शकते. त्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात येऊ शकते. ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी अशा धार्मिक प्रतिकांचा वापर करण्यास अनुमती देणे योग्य नाही.’

२. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील उडुपी येथे मुसलमान विद्यार्थिनींनी सरकारी महाविद्यालयामध्ये हिजाब घालून प्रवेश केल्यामुळे वाद झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून हिंदु तरुण-तरुणींनी भगवे उपरणे घातले होते.