संभाजीनगर येथील ‘३०-३०’ घोटाळ्यात मंत्री, आमदार आणि पोलीस अधिकारी यांची गुंतवणूक असल्याचे उघड !

घोटाळेबाजांवरील आरोप निश्चित झाल्यावर त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स

संभाजीनगर – मराठवाड्यासह राज्यात प्रसिद्ध झालेल्या ‘३०-३०’ या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संतोष राठोड याने व्यवहाराच्या नोंदी करून ठेवलेल्या नोंदवहीत २ मंत्री, १ आमदार, पोलीस उपअधीक्षक आणि १ पोलीस निरीक्षक यांची नावे असल्याचे उघड झाले आहे. नोंदवहीशी संबंधित आणि राठोड याच्या जवळच्या एका व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.

१. संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना संतोष राठोड याच्या माहितीवरून, त्याचा नातेवाईक राजेंद्र पवार यांच्याकडून पैशांचा हिशेब असलेल्या ३ नोंदवह्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यात ३०० पेक्षा अधिक नावे आहेत.
२. नोंदवहीत सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचेही नाव असून त्याने तब्बल ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, तर एका मंत्र्याच्या जवळच्या पेट्रोलपंप चालकाने एकदा ७ कोटी आणि दुसर्‍यांदा ६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्याला ३० लाख, ७० लाख आणि एकदा १ कोटी रुपयांचा परतावाही मिळाला होता. सर्वांना परतावा देतांना कुणाला ७, १०, २५, ३०, ४० आणि ६० टक्क्यांपर्यंत व्याज परत देण्याच्या नोंदीही त्यात केलेल्या आहेत.
३. राठोड याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘कोरोनामुळे राठोड याचे सर्व पैसे येण्यास विलंब झाला; पण त्याला सर्वांचे पैसे द्यायचे आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात कुणाला किती पैसे द्यायचे, हेही ठरलेले होते; पण तक्रार प्रविष्ट झाल्याने गोंधळ झाला.’’