महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये आता ‘वाईन’ मिळणार : राज्य सरकारचा निर्णय !

मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते ! – संपादक 

मुंबई – राज्यातील सुपर मार्केटमध्ये ‘वाईन’ची विक्री करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमती देण्यात आली आहे. १ सहस्र चौरस फुटांच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक या संदर्भात म्हणाले, ‘‘सध्या राज्यात दारूची प्रतिवर्षी ७० लाख लिटरची विक्री होते. पुढच्या वर्षापर्यंत दारू उद्योगाचा विस्तार १ सहस्र कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शेतकर्‍यांच्या फळ उत्पादनावर वाईन व्यवसाय चालतो. त्यांना चालना देण्यासाठी वाईनची विक्री करता येणार आहे. राज्यात नवी ‘वाईन पॉलिसी’ (धोरण) राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्य सरकारने दारूवर प्रतिलिटर १० रुपयांचा अबकारी कर घोषित केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी आयात ‘व्हिस्की’वरील शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणले आहे.

भाजपकडून टीका !

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘मस्त पियो, खूब जियो’, हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे मद्यपींना समर्पित आहे. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना औषधाची आवश्यकता आहे. पण ‘दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे ।’ हा या सरकारचा निर्णय आहे. कोरोनाच्या काळात कष्टकर्‍यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे ही यांची भूमिका आहे.’’

‘महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.