प्रजासत्ताकदिनी किशनगंज (बिहार) येथे महंमद आबिद हुसेन याच्याकडून सरकारी शाळेमध्ये राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न
|
किशनगंज (बिहार) – येथील उत्क्रमित माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने महंमद आबिद हुसेन याच्या विरोधात राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीचे पत्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. ‘आरोपीवर कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, कोरोनाच्या नियमांचे पालन करत शाळेमध्ये विद्यार्थी ध्वजारोहण करत असतांना घनपुरा गावात रहाणारा महंमद आबिद हुसेन तेथे आला आणि त्याने मला जातीवाचक शिवीगाळ चालू केली. मला धक्काबुक्की केली, तसेच राष्ट्रध्वज जाळण्याची धमकी देत ध्वज उतरवण्याचा प्रयत्न करू लागला. या वेळी लोकांनी मला वाचवले नसते, तर अनर्थ झाला असता. काही वर्षांपूर्वी आबिद याच्याकडून भूमी विकत घेऊन येथे ही शाळा बांधण्यात आली आहे. अजूनही शाळेची भूमी त्याची असल्याचे तो सांगतो. त्याला मी दूरभाष करून ध्वजारोहणासाठी बोलावले होते; मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याचा भाऊ शाळेमध्ये सुरक्षारक्षक आहे.