बीड येथे ध्वजारोहणानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर विनोद शेळके यांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा शेळके यांचा आरोप
जनतेला आपल्या समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागणे हे दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी जनतेच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा बोध यातून घ्यावा, असेच जनतेला वाटते. – संपादक
बीड – येथील पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनानिमित्त पोलीस पटांगणावर ध्वजारोहण करण्यात आले; मात्र या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांसमोर विनोद शेळके यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. विनोद शेळके यांच्या दुकानासमोरील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बीड पालवन रस्ता ते पिंपळवाडी या रस्त्याचे काम झाले असून यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
या प्रकरणी धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘कुठलाही रस्ता कोणत्या एका व्यक्तीसाठी नसतो. त्या व्यक्तीने या ठिकाणी येऊन अंगावर रॉकेल टाकून घेण्याऐवजी चौकशी करण्याची विनंती करणारे पत्र देणे अपेक्षित होते. रस्त्याच्या बांधकामाच्या संदर्भात आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.’’