केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर अल्प करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा ! – शिवसेनेचे कागल तहसीलदारांना निवेदन

कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. संभाजीराव भोकरे आणि अन्य शिवसैनिक

कागल (जिल्हा कोल्हापूर), २७ जानेवारी (वार्ता.) – मूल्यवर्धित कराची कार्यवाही झाल्यावर खताचे मूल्य स्थिर राहील, असे केंद्र सरकारने सांगितले होते; मात्र तसे न होता रासायनिक खतांचे मूल्य सातत्याने वाढतच आहे. खतांचे मूल्य वाढल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. तरी केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर अल्प करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा; अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री राजू साळोखे, गुंडाप्पा काशीद, उत्तम पाटील, वैभव आकडे, किरण दळवी, अजित माळी यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी १ लाख ७५ सहस्र टन, तर खरीप हंगामासाठी १ लाख ४२ सहस्र टन इतके रासायनिक खत शेतकर्‍यांना लागते. अगोदरच पिकवलेल्या शेतीमालाला दर नाही, अशी स्थिती आहे. त्यात रासायनिक खताचे मूल्य दुप्पट केल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.