ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुणे येथे निधन !

पुणे – ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते आधुनिक वैद्य (डॉ.) अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील रहात्या घरी निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आले. २७ जानेवारी या दिवशी दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आधुनिक वैद्य (डॉ.) अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नकार दिला. आपली पत्रकारिता गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असाहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. आधुनिक वैद्य (डॉ.) अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपूल लिखाण केले. वर्ष १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी वैद्यकिय क्षेत्राला प्राधान्य न देता समाजसेवेत मोलाचे योगदान दिले.

आधुनिक वैद्य (डॉ.) अवचट यांनी ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राचा प्रारंभ केला होता. त्यांनी आपल्या पत्नी आधुनिक वैद्य (डॉ.) सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. ‘मुक्तांगण’ परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी ‘डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान’ हा पुरस्कार दिला जातो.