पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नी प्रदूषण मंडळाची महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस !

नेहमीप्रमाणे प्रदूषण मंडळाची ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे कारवाई ! – संपादक 

कोल्हापूर, २७ जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे शेकडो मासे मृत झाल्यावर प्रदूषण मंडळाला जाग आली आहे. शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली. (श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते, असे सांगणारे पुरोगामी याविषयी गप्प का ? – संपादक) ‘१४ दिवसांत याचा खुलासा करावा’, असे त्यात सांगितले आहे. याच समवेत छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यालाही याविषयी ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोल्हापूर येथे पंचगंगा नदीत मिसळणारा जयंती नाला
कोल्हापूर येथे पंचगंगा नदीत मिसळणारा जयंती नाला
कोल्हापूर येथे पंचगंगा नदीत मिसळणारा जयंती नाला

गेले काही दिवस कोल्हापुरातील पंचगंगा नदीपात्रात राजाराम बंधार्‍याजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडले होते, तसेच इचलकरंजी येथेही प्राणवायूअभावी अनेक मासे तडफडून मृत पावले. ‘प्रजासत्ताक’ संस्थेने या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत नदीकाठाने पहाणी केली असता पंचगंगा घाट, दुधाळी नाला, जामदार नाला, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील नाला, कसबा बावडा नाला, शुगर मिल नाल्यातील सांडपाणी (प्रक्रिया न केलेले) अशा ६ ठिकाणी नाले थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. या सांडपाण्यात शहरी घनकचर्‍याचे घटकही आढळून आले आहेत. हे प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन असल्याने ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. (या नाल्यांमधील सांडपाणी गेली अनेक दिवस नदीत मिसळत असणार ! तरी इतके दिवस प्रदूषण मंडळ काय करत होते ? – संपादक)