जनता आणि निवडणूक अधिकारी यांनी जागृत होणे आवश्यक !
गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने !
१. राजकीय पक्षांविषयी जनता समाधानी नसल्याची कारणे
कुठलाही राजकीय पक्ष जनतेचे समाधान करायला असमर्थ ठरलेला आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पक्षाचे धोरण निश्चित नसणे, वेळोवेळी पक्षप्रमुखांनी धोरण पालटणे, त्यामध्ये स्वतःचा आणि पक्षाचा स्वार्थ साधणे, कोणत्याही प्रकारे सत्ता सांभाळणे, जनहिताकडे दुर्लक्ष करणे, जनतेच्या भवितव्याचा विचार न करणे, राष्ट्र-धर्मविषयक मूल्ये पायदळी तुडवणे, विरोधकांची उणीदुणी काढण्यातच प्रसारमाध्यमांचा वापर करणे अन् स्वतःची काहीच पात्रता नसतांना श्रेष्ठत्वाचा आभास निर्माण करणे, ही कारणे आहेत.
२. ‘नोटा’चा (NOTA – नन ऑफ दि अबोव्ह म्हणजे मला कुणालाच मत द्यायचे नाही) वापर
मतदार सध्या कंटाळलेले आहेत. मतदान करण्यास त्यांना उत्साह वाटत नाही. ‘कुणीही निवडून आला, तरी काहीच फरक पडणार नाही, चांगले दिवस लाभणार नाहीत’, असे सर्वांनीच अनुभवलेले आहे. जेव्हा सर्व उमेदवारांपैकी कुणीच मनाजोगता उमेदवार नसेल, तर मतदार ‘मला कुणालाच मत द्यायचे नाही’ (NOTA – नन ऑफ दि अबोव्ह), या अधिकाराचा वापर करू शकतो.
३. निवडणूक यंत्रणेने उमेदवाराला मतदाराच्या घरी जाऊ देणे, म्हणजे मतदाराला प्रभावित करण्यासारखे !
केवळ निवडणूक घोषित झाल्यावर उमेदवारांनी घरोघरी न जाता बर्याच आधी समाजसेवा करून जनतेचे आपल्याविषयीचे मत ते चांगले करू शकतात. निवडणूक यंत्रणेने उमेदवाराला मतदाराच्या घरी जाऊ देणे, म्हणजे मतदाराला प्रभावित करण्यास उमेदवाराला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. जनता आणि निवडणूक अधिकारी जागृत झाले, तर निवडणुकीत शांतीचे वातावरण निर्माण होईल, हे निश्चित !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा (८.११.२०२१)