कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील विलंब टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात आणखी कर्मचारी वाढवण्याची मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?
पुणे – कोरोना आणि ओमिक्रॉन विषाणूचा संपर्क झालेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘वॉर रूम’ सिद्ध केली आहे; मात्र अपुर्या मनुष्यबळामुळे या रुग्णांच्या संपर्काला विलंब होत आहे. दुसर्या लाटेमध्ये महापालिकेचे शिक्षक आणि पी.एम्.पी.एल्.चे कर्मचारी रुग्णांची चौकशी करत होते; मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर शिक्षक आणि कर्मचारी त्यांच्या मूळ कामावर रुजू झाल्याने सध्या ‘वॉर रूम’मध्ये एक डॉक्टर आणि माहिती भरण्यासाठी असणारी व्यक्ती हे दोघेच कार्यरत आहेत. महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. सध्या रुग्ण संख्या वाढत असल्याने या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बाधित रुग्णांशी संपर्क साधणे शक्य होत नाही. त्यामुळे याची गती वाढवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला आणखी २ कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच नियुक्ती होईल, असे साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.