भारतात येणार्या पाकिस्तानी नागरिकांसाठीची ‘व्हिसा’ची प्रक्रिया आणि भारतात आल्यावर ते बेपत्ता होणे !
१. व्हिसा घेऊन भारतात येणार्या पाकिस्तानी नागरिकांसाठी कठोर आणि तपशीलवार प्रक्रिया असतांनाही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता होणे
अ. ‘भारतामध्ये व्हिसा घेऊन आलेले शेकडो पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक बेपत्ता झाले आहेत’, असे वृत्त काही मासांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ही खरोखरच अतिशय गंभीर गोष्ट आहे. आतापर्यंत त्यांनी भारतातील भ्रष्ट व्यवस्थेचा लाभ घेऊन आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी भारतीय नागरिकत्वाचे पुरावे निर्माण केले असतील. यासाठी त्यांना संबंधित भागातील भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सर्वतोपरी साहाय्य करत असतात. मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवाया करणारे असे घरभेदी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहेत.
आ. पाकिस्तानी नागरिक भारतात व्हिसा घेऊन प्रवेश करतात, तेव्हा त्यांना २४ घंट्यांच्या आत संबंधित भागातील विदेशी नागरिक नोंदणी शाखेत माहिती देणे बंधनकारक असते. व्हिसा मिळवण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. भारतात कुठे आणि कशासाठी जाणार ? रहाण्याचे ठिकाण कोणते ? संपूर्ण पत्ता काय ? ज्या व्यक्तीकडे जाणार, तिची संपूर्ण माहिती; तिच्याशी नातेसंबंध असल्यास त्याचे पुरावे, भारतात रहाण्याचा कालावधी या सर्वांची सयुक्तिक माहिती सादर करावी लागते. ज्या व्यक्तीकडे जाणार, ती व्यक्ती पाकिस्तानी नागरिकांचे उत्तरदायित्व घेणार आहे का ? अशी माहिती सादर केल्यावरच संबंधित व्यक्तीला व्हिसा दिला जातो.
इ. विदेशी नागरिक नोंदणी शाखेत माहिती देतांना त्या वेळी त्याचे दायित्व घेणारा भारतीय नागरिक त्याच्या समवेत उपस्थित असणे आवश्यक आहे. तेव्हा त्याचाही (भारतीय नागरिकाचाही) जबाब नोंदवला जातो. पाकिस्तानी नागरिकांचे दायित्व घेणार्या भारतीय नागरिकाचा निवासी पत्ता दर्शवणारी कागदपत्रे (रहाते घर आणि मालमत्ता यांची कागदपत्रे, वीजदेयक, दूरभाष देयक, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी) पडताळले जाते. त्यांच्या छायांकित प्रती जबाबाशी जोडल्या जातात. (अनेक वेळा त्याची पडताळणी व्हिसा संमत करणार्या पाकिस्तानातील संबंधित भारतीय कार्यालयाकडूनही केली जाते.) विदेशी नागरिक नोंदणी शाखेत पाकिस्तानी नागरिकाने माहिती दिल्यानंतर प्रथम त्याचे दायित्व घेणारी भारतीय व्यक्ती आणि तो स्वतः ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असेल, ते पोलीस ठाणे यांस त्वरित (पत्र आणि बिनतारी संदेशयंत्रणा (वायरलेस) यांच्या माध्यमातून) कळवले जाते. पाक नागरिकांची सर्व कागदपत्रे पडताळून त्यांची नोंदणी झाल्यानंतरच त्याला ‘रहाण्याचा परवाना’ दिला जातो. त्यावर परकीय नागरिक नोंदणी शाखेच्या अधिकार्याची स्वाक्षरी आणि शिक्का, पाकिस्तानी नागरिकाचे छायाचित्र, पारपत्र आणि व्हिसा क्रमांक, त्याची अंतिम मुदत, तसेच आवश्यकतेप्रमाणे इतर सर्व माहिती नोंद करण्यात येते. व्हिसाची मर्यादा संपण्यापूर्वी पाकिस्तानी नागरिकाने भारत सोडून जाणे बंधनकारक आहे, तसेच भारत सोडतांना त्याने विदेशी नागरिक नोंदणी शाखेकडून मिळालेल्या रहाण्याच्या परवान्यावर ‘डिपार्चर’ (सोडण्याची अनुमती) घेणे बंधनकारक आहे. भारत देश सोडून जातांना विमानतळ आणि रेल्वेस्थानक या ठिकाणी त्या पाक नागरिकांकडून रहाण्याचा परवाना परत घेऊन संबंधित विदेशी नागरिक नोंदणी शाखेकडे पाठवले जाते.
२. काही नागरिक दीर्घकालीन व्हिसा घेऊन भारतात रहायला येणे
भारतात प्रवेश करणारे काही नागरिक दीर्घकालीन ‘व्हिसा’ घेऊन भारतात येतात. अशा नागरिकांचे बहुधा भारतियांशी विवाह झालेले असतात. त्यांचा व्हिसा ५ वर्षांचा असतो. त्यांनाही नोंदणी झाल्यानंतर विदेशी नागरिक नोंदणी शाखेकडून ‘रहाण्याचा परवाना’ दिला जातो. त्यांच्या व्हिसाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे असतात. त्यांच्या व्हिसाची मर्यादा वाढवण्याविषयीचे प्रस्ताव विदेशी नागरिक नोंदणी शाखेकडून राज्य सरकारच्या गृह विभागाकडून केंद्र सरकारकडे जातात. भारतात दीर्घकालीन व्हिसावर सलग १० वर्षांहून अधिक कालावधीसाठी रहाणारा नागरिक भारतीय नागरिकत्वासाठी विनंती अर्ज करण्यास पात्र होतो. नागरिकत्व देण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असतात. भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी सादर झालेले प्रस्ताव विदेशी नागरिक नोंदणी शाखा आणि राज्य सरकारचा गृह विभाग यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठवले जातात.
३. पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक बेपत्ता होण्यामागे कार्यरत असणारे ‘देशद्रोही’ रॅकेट
बांगलादेशी नागरिकांविषयीही थोड्याफार फरकाने असेच नियम आहेत; परंतु बांगलादेशातील ‘व्हिसा’वर प्रवेश करणारे नागरिक बहुतांश विद्यार्थी असतात.
‘भारतात अधिकृतरित्या सर्व कागदपत्रे सादर करून प्रवेश केलेले पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक बेपत्ता होतातच कसे ?’, हाच खरा प्रश्न आहे. ‘याला केवळ पोलिसांची अकार्यक्षमता, दुर्लक्ष, दायित्वशून्यता हीच कारणे आहेत’, असे म्हणता येईल; कारण पोलिसांची सुरक्षा अनेक स्तरीय असते. राज्य गुप्तवार्ता विभाग, केंद्रीय गुप्तवार्ता विभाग, स्थानिक विशेष शाखा, स्थानिक पोलीस ठाणे आणि विदेशी नागरिक नोंदणी शाखेचे विशेष पथक या विभागांना, तसेच काही विशेष पथकांना पाकिस्तानी नागरिकांच्या आगमनाची (तसेच काही विभागांना ‘व्हिसा’ संमत झाल्यावर) माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या भारतातील संपर्काचीही माहिती देण्यात येते. असे असतांनाही परकीय नागरिक बेपत्ता होत असेल, तर त्यामागे एक देशद्रोही रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.
४. भारतीय नागरिकांनी सतर्क राहिल्यास समाजातील दुष्प्रवृतींचा निःपात होऊन हिंदु राष्ट्र येईल !
समाजात वावरतांना केवळ प्रशासन, सरकार आणि पोलीस यांच्यावर अवलंबून न रहाता प्रत्येक भारतीय नागरिकाने सतर्क रहाणे आवश्यक आहे. अनधिकृत लोकवस्ती व्हायला प्रारंभ झाला, संशयित व्यक्ती आढळल्या, कुणी संशयास्पद हालचाली करतांना दिसले, एखाद्या भागात किंवा परिसरात एखादी व्यक्ती कारण नसतांना घुटमळतांना दिसली, तर प्रत्येक नागरिकाने त्याची माहिती पोलीस, पत्रकार किंवा प्रशासकीय अधिकारी यांना त्वरित द्यावी. शक्य असल्यास भ्रमणभाषसंचाच्या माध्यमातून त्याची छायाचित्रे काढून पाठवावीत. आपल्याकडे शहरातील सर्व पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्कालीन व्यवस्थापन, महानगरपालिकेचा सुरक्षा विभाग, महापालिका आयुक्त आणि त्यांचे कार्यालय या सर्वांचे दूरभाष, तसेच भ्रमणभाष क्रमांक अन् ई-मेल पत्ते निश्चितच संरक्षित करून ठेवावेत. सध्या सर्वांत वेगवान माहितीचा स्रोत हाच आहे. त्यामुळे वेळेत कारवाई होणे, साहाय्य मिळणे, दायित्व निश्चित होणे, दायित्व निश्चित झाल्यामुळे कामास गती मिळणे, सर्वांना ज्ञात झाल्यामुळे (माहिती छायाचित्रे) अवैध आणि गुन्हेगारी कारवायांना निश्चितपणे आळा बसू शकतो. याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. आपण लोकांसमोर उघडे पडत आहोत, हे पाहून अशा समाज आणि देश द्रोही लोकांचा गाशा गुंडाळला जातो. यासाठीच समाजात सर्वत्र जागरूकता येणे आवश्यक आहे. ‘आपण समाज आणि देश यांचे अंग आहोत’, याचे सतत भान ठेवून सतर्क राहिल्यास दुष्प्रवृतींचा निःपात होऊन हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही.’
– एक माजी पोलीस अधिकारी