मत्तीवडे (कर्नाटक) येथे राजमाता जिजामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमी युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले !
मत्तीवडे (कर्नाटक) – मत्तीवडे (कर्नाटक) येथे १७ जानेवारी २०२२ या दिवशी झालेल्या राजमाता जिजामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी युवतींसाठी ७ दिवसांचे स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये अनेक युवती सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात समितीच्या कु. शिवलीला गुब्याड आणि श्री. प्रथमेश गावडे यांनी शिबिरार्थींना स्वरक्षणाचे, तसेच व्यायामाचे विविध प्रकार शिकवले. या शिबिरात महिलांवरील अत्याचार, क्रांतिकारकांची राष्ट्रभक्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, असे विविध विषय युवतींना सांगण्यात आले.
सहभागी युवतींचे अभिप्राय
१. कु. श्रेया डोंगले – महाविद्यालयाला जातांना मला भीती वाटायची. या शिबिरामुळे माझ्यातील भीती न्यून झाली आहे.
२. कु. शिवानी – गावातून शहरात जाण्यासाठी आम्हाला ३ किलोमीटर चालत जावे लागते. उसाच्या गाड्याही रस्त्यावरून जातात. अगोदर पुष्कळ भीती वाटत असे. ती या शिबिरामुळे न्यून झाली. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने विविध शाळांमध्ये निवेदन देण्याच्या सेवेत सहभागी झाल्याने आनंद मिळाला.
३. कु. धनश्री यादव – अगदी सोप्या पद्धतीने प्रशिक्षण शिकवण्यात आले. याचा सराव करून ते इतरांनाही शिकवेन.
४. कु. करुणा आणि कु. धनश्री पोटले – आमच्या गावापर्यंत कुणीतरी येऊन आम्हाला असे प्रशिक्षण शिकवेल, असे वाटले नव्हते; पण ते या शिबिरामुळे ते शक्य झाले.
५. सौ. वासंती आणि सौ. स्वरा – या शिबिरामुळे माझ्यात धाडस निर्माण झाले. त्यामुळे आम्ही एकटे सुद्धा शेतावर कामासाठी जाऊ शकतो.
वैशिष्ट्यपूर्ण
१. शिबिरात ३ र्या दिवशी प्रशिक्षण चालू असतांना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्या वेळी उपस्थित धर्मप्रेमी युवतींनी भ्रमणभाषच्या विजेरी चालू करून प्रशिक्षण केले. वर्गामध्ये ‘श्री महालक्ष्मीदेवीचे स्मरण करूया’, असे वाक्य प्रशिक्षकांनी उच्चारताच वीजपुरवठा सुरळीत चालू झाला. यातून देवीचा आशीर्वाद या शिबिराला लाभल्याची प्रचिती सर्वांना घेता आली.
२. शिबिर पूर्ण झाल्यानंतर युवतींनी नियमित एकत्र येऊन अर्धा घंटा नामजप आणि अर्धा घंटा प्रशिक्षणाचा सराव चालू केला आहे.
३. गावातील धर्मप्रेमी श्री. दशरथ डोंगळे यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे पूर्ण आयोजन केले.
४. प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या, तसेच युवतींनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे लिखाण गावातील फलकांवर लिहिले.