भारताच्या अद्वितीयत्वाचा अभ्यास करणार्या कॅरोलिना गोस्वामी यांचे क्रांतीकारी विचार !
‘कॅरोलिना गोस्वामी या मूळच्या युरोपीय देश पोलंडच्या ! भारतात येण्यापूर्वी अनेक लोकांनी कॅरोलिना यांना भारताविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. भारतात महिलांवर अत्याचार होतात; येथील माणसे बलात्कारी आहेत; रस्ते घाणेरडे आहेत, भारत हा गरिबांचा देश आहे इत्यादी. योगायोगाने अनुराग गोस्वामी या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडून कॅरोलिना आणि अनुराग यांचा विवाह झाला. प्रत्यक्षात जेव्हा कॅरोलिना भारतात आल्या, तेव्हा त्यांना भारताचे वेगळेच रूप दिसले. शेवटी त्यांना लक्षात आले की, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मुद्दामहून भारताची अपकीर्ती चालवली आहे. यात ब्रिटिशांचा पुढाकार असल्याचे त्यांचे ठाम मत झाले. या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भारतभर प्रवास करून गेल्या ६० वर्षांत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले भारताचे वर्णन कसे खोटे आहे ? हे त्या त्यांच्या ‘युट्यूब चॅनेल’वरून सांगतात.
१. जगातील सगळे क्रांतीकारी शोध हे गेल्या २०० वर्षांत लागले. नेमक्या याच काळात इंग्रजांनी भारतातील प्राचीन संस्कृत ग्रंथ आणि वैभव लुटले. भारतियांना शिकवलेल्या संस्कृत भाषेतील योग, आयुर्वेद, भौतिकशास्त्र आणि वैदिक गणित या गोष्टी इंग्रजांनी मुद्दामहून लपवून ठेवल्या.
२. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी जगभरात भारताची अपकीर्ती हेतूपुरस्सर चालवली आहे. यात ब्रिटिशांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ‘आम्ही भारताचे रक्षणकर्ते आहोत’, असे ब्रिटिशांना यातून जगाला दाखवायचे असून त्यातून भारतातील त्यांचे अवैध वास्तव लपवायचे आहे.
३. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्येच भारतीय आस्थापनांनी जागतिक व्यापारात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. भारतीय अर्थव्यस्था आता गतीने पुढे जात आहे. सध्या ती गती अल्प असली, तरी भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक गतीने वाढणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. भारत केवळ विकास करत नाही, तर प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे.
४. जे संयुक्त राष्ट्र सर्व देशांना एकत्र आणायची गोष्ट करते, ते प्रत्यक्षात मात्र जागतिक नेत्यांना एका मंचावरसुद्धा आणू शकत नाही. पृथ्वीवरील प्रदूषणाला कारणीभूत असणारे हे देश पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या गोष्टी करतात. जगाला पर्यावरणाच्या ज्या समस्या आज भेडसावत आहेत, त्या समस्यांचे भारताने ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. जगाला कुठल्याही ‘सुपरपावर’ची आवश्यकता नाही, तर ‘सुपरगुरु’(विश्वगुरु) ची आवश्यकता आहे आणि खूप उशीर होण्याआधी आवश्यकता आहे.
५. भारतातील वर्णव्यवस्था (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र) ही व्यक्तीच्या कर्मावर आधारित होती. इंग्रजांनी ती व्यक्तीच्या जन्मावर आधारित केली. ‘वर्ण’ हे मुळात व्यक्ती काय काम (कर्म) करते, त्यावर ठरते. ‘ब्राह्मण – ज्ञानार्जन, क्षत्रिय – रक्षण, वैश्य – व्यापार, शुद्र – सेवा’ हे कामाच्या स्वरूपावर ठरते, जन्मावर नाही. कास्ट सिस्टम (जातीव्यवस्था) इंग्रजांनी आणली. मुळात इंग्रजीतील ‘कास्ट’ या शब्दाला संस्कृतमध्ये समानार्थी शब्दच नाही. (जात म्हणजे ‘कास्ट’ नव्हे.)
(दैनिक सनातन प्रभात, १६.८.२०१७)