भारत हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर..!

काही गोष्टींचा उहापोह आपण भारत प्रजासत्ताक कसे नाही ? असा केला, तरी काही लक्षणीय पालट भारतात घडत आहेत. त्यांचाही मागोवा या निमित्ताने घेतला पाहिजे. विद्यमान सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या अंतर्गत शस्त्रास्त्रे, जीवनावश्यक औषधे, अन्य साहित्य भारतातच बनवले आहे. हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्‍या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.

१. बनारस हिंदु विश्वविद्यालयात हिंदु धर्माची पदवी देणारा अभ्यासक्रम चालू !

भारतात बहुसंख्य हिंदू आहेत; मात्र धर्माचे ज्ञान असलेले किती, तर नगण्य आहेत. राज्यघटनेनुसार अन्य पंथियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळते; मात्र ‘निधर्मी’पणाच्या नावाखाली हिंदूंना मात्र नाही. हा मोठा विरोधाभास हिंदु जनसंख्येला त्यांच्या हिंदुत्वापासून तोडत होता; मात्र हिंदु धर्माच्या शिक्षणाची मागणी पुढे आली. बनारस हिंदु विश्वविद्यालयात हिंदु धर्माचे शिक्षण घेऊन त्यात पदवी मिळवण्याची व्यवस्था झाली. भविष्यात अन्यही विद्यापिठांमधून यासाठी अभ्यासक्रम सिद्ध होऊन हिंदूंना हिंदु धर्म शिकवण्याची व्यवस्था होईल. ती व्यवस्था केली की, हिंदु श्रद्धेने धर्माचरण करू लागतील. तेव्हा त्यांच्यातील सुप्त स्वरूपात असलेले धर्मतेज प्रकट होऊन कार्यरत होणार आहे.

२. गुरुकुलाकडे वाटचाल करूया !

हिंदूंना हिंदु धर्म शिकण्याची गोडी लागली की, गुरुकुल व्यवस्थेला पुन्हा एकदा प्रारंभ होऊ शकतो. जेथे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आचार्य, संत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध शास्त्रे, कला यांचे शिक्षण घेऊन पारंगत होऊ शकतो. त्याला अन्य पदव्यांची आवश्यकता उरणार नाही. तो स्वत:च त्याच्या योगक्षेमासह राज्य, राष्ट्र यांचाही योगक्षेम कुशलतेने वाहू शकत असे. गुरुकुलात पारंगत विद्यार्थ्याचे सामर्थ्य एवढे असायचे की, तो एखाद्या राजालाही ललकारून त्याला हवे ते करण्यास बाध्य करू शकायचा.

३. हिंदु धर्मात घरवापसी 

श्री. यज्ञेश सावंत

भारतावरील मोगलांच्या इस्लामी राजवटीत अनेक हिंदु कुटुंबांचे तलवारीच्या धाकावर, छळाबळाने धर्मांतर झाले होते. पोर्तुगीज, इंग्रज यांच्या राजवटीतही कपटाने काही कुटुंबांचे धर्मांतर झाले होते. या कुटुंबांपैकी काही कुटुंबांना पुन्हा मूळ हिंदु धर्मात येण्याची ओढ लागल्याने त्यांची ‘घरवापसी’ झाली आहे. असे अनेकजण पुन्हा हिंदु धर्मात येण्यास उत्सुक आहेत. हिंदु धर्मातून अन्य धर्मांत धर्मांतर हे एक प्रकारे राष्ट्रांतर आहे, तसेच हिंदूंच्या शत्रूतही वाढ आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. यामुळे हे हिंदू पुन्हा मूळ अशा हिंदु राष्ट्राकडेच वळत आहेत, असे म्हणावे लागेल.

४. हिंदूंच्या प्राचीन आणि आध्यात्मिक वारसा सांगणार्‍या मंदिरांचा जीर्णाेद्धार !

सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील विविध बांधकामे हटवून त्याचा परिसर विस्तीर्ण करण्यात आला आहे. येथील छोटी छोटी मंदिरे मूळ रूपांसह वसवण्यात आली आहेत. काही मंदिरांतील चोरलेल्या आणि विदेशात पळवून नेलेल्या मूर्ती पुन्हा संबंधित मंदिरांमध्ये स्थापित केल्या जात आहेत. मंदिरे ही हिंदु धर्माची, पर्यार्याने हिंदु राष्ट्राची आधारशिला आहेत. ती ऊर्जास्रोत आहेत. अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या मंदिराचे काम प्रगतिपथावर आहे. मथुरा, वृंदावन, द्वारका येथेही हिंदूंना पालट अपेक्षित आहे.

५. ब्रिटीशकालीन कायदे पालटण्यासाठी प्रयत्न

ब्रिटीशांनी सिद्ध केलेले वर्ष १८६० मधील कायदेच भारतात लागू आहेत. हे कायदे पालटून प्राचीन भारतीय न्यायशास्त्रानुसार कायद्यांची फेररचना करण्यासाठी नवी देहली येथे पहिले आंदोलन झाले. हा एकप्रकारे प्रारंभ आहे. हे आंदोलन निश्चितच वेग पकडून ब्रिटीशकालीन कायदे पालटण्यात येतील अशी आशा आहे.

६. हिंदु राष्ट्राचा शंकराचार्यांसह अनेकांकडून उद्घोष !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम केलेला हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष आता अन्यही करू लागले आहेत. मुख्य म्हणजे पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, संत आणि काही हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राचा उद्घोष करू लागल्या आहेत. यामुळे कृतीशील हिंदूंची तरी हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू होईल.

७. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान !

या वर्षी प्रजासत्ताकच्या कार्यक्रमांमध्ये थोडे वेगळेपण म्हणजे ‘आझाद हिंद सेने’चे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमांत समाविष्ट केला आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनाचे कार्यक्रम २३ जानेवारीपासून चालू झाले, तसेच ‘इंडिया गेट’मध्ये त्यांचा सैनिकाच्या गणवेशातील पुतळा उभारण्यात आला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचाच मोठा वाटा होता, नव्हे त्यामुळेच ब्रिटिशांना भारत सोडावा लागला, हे भारताला ब्रिटिशांच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची अधिकृत प्रक्रिया करणारे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेन्ट ॲटली यांनी स्वत: भारताचे तत्कालीन गव्हर्नर पी.बी. चक्रवर्ती यांना सांगितले होते.

संकलक – श्री. यज्ञेश सावंत, देवद, पनवेल.