सुवर्ण जयंती महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान !
‘देशामध्ये २३ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत ‘सुवर्ण भारताच्या दिशेने’ हा कार्यक्रम विविध प्रकारे साजरा करण्यात येत आहे. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याशिवाय वर्ष १९७१ चे युद्ध जिंकण्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये पुष्कळ मोठे योगदान असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती आहे. या कारणांमुळे या वर्षी प्रजासत्ताकदिनाचे संचलन भव्य प्रमाणात असणार आहे.
लाल किलेपर तिरंगा लहराने के लिए तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा ! – नेताजी सुभाषचंद्र बोस |
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी या दिवशी झाली. त्यामुळे या महोत्सवाला २३ जानेवारी या दिवसापासून प्रारंभ करण्यात आला आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी देहलीतील राजपथावर पथसंचलन होते. या ‘परेड’मध्ये सामान्यत: विदेशी पाहुण्यांना बोलवण्यात येते. या वेळी आपल्या सैन्य शक्तीचा परिचय तर दिला जातोच, याशिवाय तेथे विविध राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून आपल्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचे योगदानही सादर केले जाते. त्यानंतर ‘बिटींग द रिट्रीट’ हा समारंभ होतो. ‘बिटींग द रिट्रीट’ म्हणजे आपल्या सैन्याचा वाद्यवृंद विविध प्रेरणादायी धून सादर करतो. या कार्यक्रमाचे संपूर्ण देशभरात थेट प्रसारण केले जाते. या वाद्यवृंदाचे आपल्या देशाला प्रेरणा देण्यामध्ये मोठे योगदान आहे. यंदा राफेलसह ७५ लढाऊ विमाने एकाच वेळी उड्डाण करणार आहेत. याशिवाय १ सहस्र ड्रोनचे एकाच वेळी प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये किती प्रगती केली आहे, त्याचा जगाला परिचय करून देण्यात येणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याविषयी विविध भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात लिखाण करण्यात आले आहे. जेव्हा दुसरे महायुद्ध चालू झाले, तेव्हा एका बाजूला जपान, जर्मनी आणि इटली अन् दुसर्या बाजूने इंग्लंड प्रमुख देश असलेले अन्य युरोपीय देश होते. नंतर अमेरिकाही या लढाईमध्ये सहभागी झाली. त्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान आणि जर्मनी यांच्या साहाय्याने अनुमाने ६० सहस्र भारतीय सैनिकांना एकत्र केले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिशांशी लढण्यासाठी जपानसमवेत भारताकडे आगेकूच केले. त्यांनी इंम्फाळ, कोहिमा यांसारख्या लढाया लढल्या. यात मोठ्या प्रमाणात रक्त सांडले. नेताजी यांचे ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा’ हे अतिशय प्रेरणादायी वाक्य आहे. दुर्दैवाने ते हे युद्ध जिंकू शकले नाहीत; कारण दुसर्या महायुद्धामध्ये जपान आणि जर्मनी यांचा पराभव झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे सैन्य यांच्या पराक्रमामुळे संपूर्ण भारतात अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले, ज्याने ‘आपण जर ब्रिटिशांना ‘जशास तसे’ उत्तर दिले, तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळेल’, असे संपूर्ण देशाला लक्षात आले. तेव्हापासून भारतीय सशस्त्र सेनेमध्ये विविध विद्रोह चालू झाले. (१८५७ चे युद्ध हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध समजले जाते.) ब्रिटिशांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांना सरतेशेवटी भारत सोडावा लागला.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. ते वर्ष १९५५ किंवा १९५६ मध्ये पाहुणे म्हणून भारतात आले होते. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की, दुसरे महायुद्ध ब्रिटिशांनी जिंकले होते. मग त्यांनी भारताला स्वातंत्र्य कसे काय दिले ? तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘यामध्ये ‘इंडियन नॅशनल आर्मी’ यांचे मोठे योगदान होते. दुसर्या महायुद्धात ३५ ते ४० लाख भारतीय सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले होते. त्यात त्यांची शक्ती लक्षात आली होती. यानंतर इंग्रज एवढे घाबरले की, त्यांनी वर्ष १९४४ मध्ये सैनिकांची ही संख्या न्यून केली. एक वेळ अशी आली की, ही संख्या ४-५ लाख पर्यंत पोचली होती. यावरून ब्रिटीश ‘इंडियन नॅशनल आर्मी’मुळे किती घाबरले होते, हे लक्षात येईल.
‘इंडिया गेट’ आणि ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’
देहलीतील ‘इंडिया गेट’ येथे काही दिवसांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लावण्यात येणार आहे. (ग्रॅनाईटचा पुतळा पूर्ण होण्यास काही वेळ लागणार असल्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले आहे. होलोग्राम पुतळा म्हणजे कृत्रिम प्रकाशाद्वारे संबंधिताचा आभासी पुतळा सिद्ध करणे.) त्यानंतर इंडिया गेट हे सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाणार आहे, तेथून हे संचलन चालू होईल. तेथे ‘अमर ज्योती’ कायम प्रज्वलित रहात होती, ती आता भारताच्या ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’ येथे विलीन करण्यात आली आहे. ‘इंडिया गेट’ हे दुसर्या महायुद्धातील हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आले होते. वर्ष १९७१ च्या युद्धामध्ये साडेतीन सहस्र सैनिकांनी प्राणांचे बलीदान दिले होते. त्या दृष्टीनेही या स्थानला महत्त्व दिले जात होते. देश सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय सैन्याचे मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याने विविध लढाया लढल्या आहेत आणि अजूनही ते आतंकवादाच्या विरोधात लढाई लढत आहेत. त्यात प्रतिवर्षी १५० ते २०० सैनिक आणि अधिकारी यांच्या प्राणांचे बलीदान होते. त्या सर्वांसाठी आता ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’ ठेवण्यात आले आहे. तेथे भारतासाठी लढणार्या प्रत्येक हुतात्मा सैनिकाचे नाव आणि पराक्रम यांची माहिती आपल्याला मिळते. ही माहिती प्रत्येक वेळी अद्ययावत केली जाते. हे मेमोरियल अतिशय उत्कृष्ट आहे. तिथे प्रत्येक भारतियाने भेट देऊन त्यांना ‘सॅल्युट’ केला पाहिजे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.