धर्मयोद्धे पुरातत्वज्ञ : डॉ. नागस्वामी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेकडून ‘पद्मभूषण’ पुरस्कार स्वीकारतांना डॉ. आर्. नागस्वामी (डावीकडे)

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर पुरातत्वज्ञ आणि शिलालेख तज्ञ डॉ. आर्. नागस्वामी (वय ९१ वर्षे) यांचे २३ जानेवारी २०२२ या दिवशी निधन झाले. पुरातत्वशास्त्राच्या व्यतिरिक्त कला, वास्तूशास्त्र, साहित्य, पॅलेओग्राफी (प्राचीन लेखनपद्धतींचा अभ्यास), प्राचीन न्यायशास्त्र, संगीत, नृत्य आदी विविध क्षेत्रांत त्यांचे प्रावीण्य होते. यामुळे त्यांच्या जाण्याने अष्टपैलू पुरातत्वज्ञाला आपण मुकलो आहोत. त्याही पुढे जाऊन हिंदूंचा गौरवशाली इतिहास समोर आणण्यासाठी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, बुद्धीवादी यांच्या विरोधात निडरपणे लढणारा एक प्रखर धर्मयोद्धा भारताने गमावला आहे. ही पोकळी भरून न येणारी आहे. भारताचा समृद्ध इतिहास पुसून त्याला निधर्मी स्वरूप देण्याचा घाट स्वातंत्र्यानंतर घालण्यात आला. हे षड्यंत्र रचणार्‍यांच्या विरोधात डॉ. नागस्वामी यांनी रणशिंग फुंकले. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘पर्यायी इतिहास’ असे काही नसते. इतिहास हा तथ्यांवर आधारित असतो.’ हे तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत अंगिकारले. त्यांच्याकडे असलेल्या सखोल ज्ञानाचा उपयोग त्यांनी ऐतिहासिक तथ्ये समोर आणण्यासाठी केला. त्यांनी मांडलेले सिद्धांत किंवा तथ्ये ही इतकी अचूक आणि परिपूर्ण असत की, त्यांना विरोध करण्याचे धारिष्ट्य पाश्चात्त्यांच्या तालमीत सिद्ध झालेले इतिहासकार किंवा पुरातत्वज्ञ यांच्यात नव्हते. सध्या भारतीय पुरातत्व विभागाचे ‘इस्लामी पुरातत्व विभागा’त रूपांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुरातत्वज्ञ आणि तमिळनाडू पुरातत्व विभागाचे व्यवस्थापक म्हणून डॉ. नागस्वामी यांनी २२ वर्षे केलेल्या कार्याची उजळणी होणे अतिशय आवश्यक आहे.

सखोल अभ्यासामुळे विदेशातही प्रभाव !

तमिळनाडूतील पुंपूहार येथे समुद्राच्या खाली पुरातत्व संशोधनास त्यांनी प्रथम आरंभ केला. यासह पुगालूर येथे चेरा राजघराण्याच्या काळातील शिलालेखांचे जतन, चोला राजघराण्याच्या काळातील राजवाड्याचे जतन, १७ व्या शतकातील थिरूमलाई नायक यांच्या राजवाड्याचे जतन आदी विविध कार्ये त्यांच्या कार्यकाळात झाली. ही सूची मोठी आहे; मात्र तरीही ‘नटराजाची मूर्ती लंडन येथून भारतात आणणारे डॉ. नागस्वामी’ हीच त्यांची विशेष ओळख सामान्य हिंदूंच्या मनात कायम राहील. वर्ष १९८६ मध्ये लंडन येथील उच्च न्यायालयात हा खटला चालू झाला. डॉ. नागस्वामी यांच्यासमोर बाका प्रसंग होता; कारण समोरील न्यायाधिशाला भारतीय संस्कृतीविषयी काडीचेही ज्ञान नव्हते. तसेच नटराजाची मूर्ती भारताला कोणत्याही परिस्थितीत मिळू नये; म्हणून विरोधी पक्षकार सर्व सिद्धतेनिशी न्यायालयात उभा ठाकला होता; मात्र डॉ. नागस्वामी यांनी विविध ऐतिहासिक तथ्ये न्यायालयासमोर सादर केली. त्यांच्या विद्वत्तेने न्यायाधीश इतके प्रभावित झाले की, या खटल्याच्या सुनावण्यांच्या वेळी ते डॉ. नागस्वामी यांना विविध प्रश्न विचारत, त्यांच्याकडे अनेक ऐतिहासिक पुराव्यांविषयी स्पष्टीकरण मागत. डॉ. नागस्वामी हेही न कंटाळता न्यायाधिशांच्या शंकांचे निरसन करत. अंततः वर्ष १९९० मध्ये ही मूर्ती भारताला परत मिळाली. त्या वेळी लंडन उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी ‘चोला काळातील कास्य मूर्तींविषयी अभ्यास असणारे असामान्य तज्ञ !’, असे म्हणून डॉ. नागस्वामी यांना गौरवले. यावरून त्यांचा पुरातत्व क्षेत्रातील अधिकार आपल्या लक्षात येईल. असे असले, तरी डॉ. नागस्वामी यांचे महत् कार्य मात्र दुर्लक्षितच राहिले. डॉ. नागस्वामी तमिळनाडूचे रहिवासी. मागील काही दिवसांत तमिळी चित्रपट कलाकार धानुष आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांचे प्रसारमाध्यमांत चर्वण केले गेले; मात्र डॉ. नागस्वामी यांच्या निधनाच्या वृत्ताचे आणि त्यांनी केलेल्या कार्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झाली नाही, हे संतापजनक आहे.

द्रविडी तत्त्वज्ञानाची चिरफाड !

डॉ. नागस्वामी यांनी थेट ‘स्टॅलिन यांनी तमिळी इतिहासाचे ज्ञान आहे का ?’, असा प्रश्न विचारत ‘थिरूक्कल’विषयी अनेक ऐतिहासिक संदर्भ देत त्याच्यावर वेदांचा कसा प्रभाव होता, हे स्पष्ट केले.

‘आमची तमिळ संस्कृती’, ‘तमिळी भाषा ही संस्कृतपेक्षा पुरातन’, ‘आमची परंपरा वेगळी’, असे खोटे दावे करत तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याचा कट तेथील पेरियारवादी आणि द्रमुकसारखे हिंदुद्वेषी पक्ष यांनी रचला आहे; मात्र या सर्वांनाच डॉ. नागस्वामी पुरून उरले. अनेक तमिळी राजघराण्यांनी त्यांच्या काळात वेदांची शिकवण देणारी विद्यालये स्थापन केली होती. त्या काळातील शिलालेखांचा अभ्यास करून त्यांनी उदाहरणासह ‘तमिळ संस्कृती ही भारतीय संस्कृतीचाच भाग आहे’, हे पटवून दिले. डॉ. नागस्वामी यांच्या हयातीत गाजलेला वाद म्हणजे ‘थिरूक्कुरल’ या काव्याचा उगम वेदांमध्ये आहे’, याविषयी त्यांनी वर्ष २०१९ मध्ये केलेले भाष्य. ‘थिरूक्कुरल’ हा तमिळी जनतेसाठी अस्मितेचा विषय आहे; कारण थिरूवल्लूवर या थोर तमिळी कवीने त्याची रचना केली आहे. डॉ. नागस्वामी यांनी केलेले वक्तव्य द्रमुकचे अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन यांना चांगलेच झोंबले. त्यांनी डॉ. नागस्वामी यांच्यावर टीका केली. डॉ. नागस्वामी यांनी थेट ‘स्टॅलिन यांनी तमिळी इतिहासाचे ज्ञान आहे का ?’, असा प्रश्न विचारत ‘थिरूक्कल’विषयी अनेक ऐतिहासिक संदर्भ देत त्याच्यावर वेदांचा कसा प्रभाव होता, हे स्पष्ट केले. लक्षात घ्या, तमिळनाडूमध्ये बहुतांश जनता द्रविडी किंवा तमिळ संस्कृतीचा उदोउदो करत असतांना प्रवाहाच्या विरोधात जाऊन अशी विधाने करणे आणि त्यासाठी प्रसंगी राजकारण्यांशीही दोन हात करण्याची डॉ. नागस्वामी यांची निडर वृत्ती उल्लेखनीय आहे. अन्य पुरातत्वज्ञ आणि त्यांच्यातील हे वेगळेपण ठळक दिसते.

डॉ. आर्. नागस्वामी

साधे रहाणीमान असलेले आणि सदैव कपाळावर भस्म धारण करणारे डॉ. नागस्वामी हे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी चंद्रशेखरानंद सरस्वती यांचे शिष्य होते. त्यामुळे त्यांना साधनेचीही बैठक होती. डॉ. नागस्वामी यांनी पुरातत्व क्षेत्राशी निगडित अनेक पुस्तके लिहिली. या पुस्तकांना असलेली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक झालर हे त्यांचे वैशिष्ट्य होय. भारतातील ऐतिहासिक ठेवा जपायचा असेल, तर हिंदुत्वाची बैठक असलेल्या डॉ. नागस्वामी यांच्यासारख्या पुरातत्वज्ञांची नितांत आवश्यकता आहे. अशा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्वज्ञांनी डॉ. नागस्वामी यांचा वारसा पुढे चालवणे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल !