निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन
निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन !
पेडणे, २४ जानेवारी (वार्ता.) – सध्या राज्यात निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे, तसेच कोरोनाचे निर्बंधही लागू आहेत. या नियमांनुसार ५ हून अधिक माणसे एकत्र येण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नियम बाजूला सारून रविवार, २३ जानेवारी या दिवशी रात्री गावडेवाडा, मोरजी येथील एका रिसॉर्टमध्ये अवैधपणे किमान ५०० हून अधिक पर्यटकांचा सहभाग असलेल्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ध्वनीप्रदूषणाविषयीची कोणतीही अनुज्ञप्ती आली नव्हती. याच्या विरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर आल्यानंतर स्थानिक ध्वनीप्रदूषणविरोधी समितीच्या लोकांनी पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांना याविषयी माहिती दिली. (लोकांना कळते ते न कळणारे पोलीस ! – संपादक) पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी लगेच पोलीस फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला. त्या वेळी पर्यटक सैरावैरा धावू लागले. पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अनेक वाहने मुख्य रस्त्यावर उभी केलेली असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. संगीत रजनी संपल्यानंतर निवडणूक भरारी पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी घटनास्थळाचे चित्रीकरण केले. (संगीत रजनी संपल्यानंतर पोचणारे निवडणूक भरारी पथक काय कामाचे ? – संपादक) पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले आहे. परराज्यातील व्यावसायिकांनी या संगीत रजनीचे आयोजन केले होते. या रिसॉर्टमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून संगीत रजनी आयोजित केली जात असून त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होतो. मात्र यासंबंधी काहीही कारवाई केली जात नाही.
मोरजी पंचायतही कारवाई करणार !
पोलीस याच्या विरोधात योग्य ती कारवाई करतील, असे स्थानिक पंच विलास मोरजे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा नोंद केल्यानंतर मोरजी पंचायतही कारवाई करण्यास बांधील आहे. अनुज्ञप्ती नसतांना संगीत रजनी आयोजित करणे हा गुन्हा आहे. मी स्थानिक लोकांशी सहमत आहे.’’