क्रीडा आणि मुसलमानांची कट्टरता
‘नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये ‘ॲशेज्’ ही कसोटी क्रिकेटची द्विपक्षीय मालिका पार पडली. त्यांच्यातील विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विजयोत्सवाच्या वेळी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग घडला. त्याची सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आणि अनेकांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
हा वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग, म्हणजे मालिका विजेत्या ऑस्ट्रेलियाचा मुसलमान खेळाडू उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाचा संघ करत असलेल्या विजयोत्सवात सहभागी न होता, एका बाजूला उभा होता. मालिकेत विजय मिळवल्यावर किंवा एखादी ‘ट्रॉफी’ जिंकल्यानंतर विजयी संघाचे खेळाडू विजयोत्सव म्हणून ‘शॅम्पेन’ (एक प्रकारची दारू) उडवतात. इस्लाममध्ये दारूचा संपर्क निषिद्ध मानला आहे. उस्मान ख्वाजा निष्ठेने धर्मपालन करत असल्याने तो ‘शॅम्पेन’चा एकही थेंब अंगावर उडू नये; म्हणून वेगळा उभा होता. या कारणास्तव ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सहकार्यांना ‘शॅम्पेन’ उडवण्यापासून रोखले आणि विजयोत्सवात उस्मान ख्वाजाला सहभागी करून घेतले.
आता तुम्हाला प्रश्न पडेल, ‘यात आक्षेपार्ह ते काय ? पॅट कमिन्सने योग्य तेच केले.’ होय ! पॅट कमिन्सने जे केले, ते एका आदर्श कर्णधाराला शोभेसेच आहे. तो काही वादाचा विषय नाही. आता वाद कुठे उद्भवतो ?, तर इस्लामेतर खेळाडू मुसलमान खेळाडूंना धर्मपालन करता यावे; म्हणून साहाय्य करतात; परंतु बहुसंख्य मुसलमान असलेल्या संघांमधील मुसलमान खेळाडू असे साहाय्य अन्य धर्मीय खेळाडूंना त्यांच्या धर्माचे पालन करण्यास साहाय्य करतात का ? कॅमेर्यासमोर किंवा कॅमेर्याच्या अपरोक्ष मुसलमान खेळाडूंचे वर्तन अन्य धर्मियांना सन्मानाची वागणूक देणारे नसते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तान संघामध्ये दानिश कनेरिया नावाचा हिंदु खेळाडू होता. त्याला मिळणार्या सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करावी लागली. काही दिवसांपूर्वी त्याने याविषयी वाच्यता केली होती; मात्र त्याची नोंद फारशी कुणी घेतली नाही.
त्यामुळे येथे प्रश्न उद्भवतो, ‘मुसलमान खेळाडू अन्य धर्मिय खेळाडूंच्या धर्मभावनांचा कधी विचार करतील का ?’ मुसलमानांच्या आक्रमकतेमुळे त्यांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य मिळते; परंतु हिंदूंना ही सवलत दिली जात नाही. यात निधर्मीवादी आणि पुरोगामी जन्महिंदूही हिंदूंचा धर्माभिमान त्यांचा तेजोभंग करून दाबून टाकतात. याचा अर्थ क्रीडा प्रकारांमध्येही मुसलमानांची कट्टरता शिरोधार्य आणि हिंदूंचा धर्म मात्र कस्पटासमान ! ही निधर्मीवादी आणि पुरोगामी यांची असहिष्णुताच होय ! जगभरामध्ये मुसलमान स्वतःच्या धर्माचे पालन करतांना अन्य धर्मियांची मुस्कटदाबी करत असतात, हे पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंची दुःस्थिती पाहिल्यावर लक्षात येते.
मुसलमान खेळाडूंची धर्मांधता आणि हिंदुद्वेष !
क्रीडाजगत हे संघभावना आणि खिलाडू वृत्ती यांविषयी काटेकोर असायला हवे. आपण ज्या संघाकडून खेळतो, त्या संघाच्या सर्वाेच्च विजयामध्ये खरेतर सर्वांनी मनापासून सहभागी व्हायला हवे; परंतु मुसलमान खेळाडू अन्य धर्मीय संघांकडून खेळतांना खेळ किंवा संघभावनेला महत्त्व न देता स्वतःच्या धर्मपालनास प्राधान्य देतात. जसे उस्मान ख्वाजाने केले, तसेच वर्ष २०१९ चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडने जिंकल्यानंतर इंग्रज खेळाडू विजयोत्सव साजरा करत असतांना त्याच संघाचा भाग असलेले मोईन अली आणि आदिल रशिद संघाचा विजयोत्सव दूर उभे राहून बघत होते. यात त्यांनी धर्मपालनाला अधिक महत्त्व दिले. शुक्रवारच्या दिवशी पाकिस्तान संघाचा सामना चालू असल्यास दुपारच्या नमाजाची वेळ झाल्यावर सामना थांबवून पाकिस्तानी खेळाडू नमाजपठणासाठी जातात. हे अनेकदा दूरचित्र वाहिन्यांवरून सामन्याचे थेट प्रक्षेपण पहातांना सर्वांनी अनुभवले आहे. नमाजपठण झाल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर उतरतात, तेव्हा ते अधिक आक्रमक झालेले असतात. ते त्यांच्या देहबोलीवरून स्पष्टपणे दिसत असते. वर्ष २०२१ च्या ‘टी २०’ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने भारतीय संघाचा पराभव केला. तेव्हा विजयी फटका खेळणार्या पाकिस्तानी खेळाडूने भर मैदानात भारतीय खेळाडू आजूबाजूला असतांना नमाज अदा केली आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनुस याने त्याचे समर्थन केले. यावरून मुसलमान खेळाडूंची कट्टरता आणि हिंदुद्वेष क्रीडास्पर्धांमध्ये दिसून येतो.
आज जगभरामध्ये पसरलेला उदारमतवाद (लिबरलीझम्) मुसलमानांना त्यांचे धर्मपालन करता यावे, यासाठी मुक्तता देतो; मात्र हिंदूंनी धर्मपालनाचा विषय काढल्यास त्यांच्यावर सनातनी, कर्मठ, प्रतिगामी म्हणून शिव्याशाप देतो. येथे अधोरेखित करावेसे वाटते की, परस्पर सहकार्य दोन्ही बाजूंनी असायला हवे. केवळ एकाला झुकते माप दिले, तर त्याला सहजीवन म्हणता येणार नाही. ती उदारमतवाद्यांनी अंधपणे स्वीकारलेली झूल आहे. त्यामुळेच आज जगाचा समतोल बिघडत चालला आहे. विशेषकरून यात हिंदू समाज भरडला जात आहे. उदारमतवाद्यांची ही चलाखी उघड करून दाखवण्यासाठी हा लेखनप्रपंच !’
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२२)