दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती
|
जळगाव – भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची दहा रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. प्रत्यक्षात मात्र दहा रुपयांची सर्व नाणी वैध असूनही समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी दहा रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात. तरी ही नाणी स्वीकारण्यास नकार देणार्यांविरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी, अशा आशयाची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, संभाजीनगर, नगर, परभणी, नांदेड येथील प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेले ‘सुराज्य अभियान’चे निवेदन –
(निवेदन वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
निवेदनात म्हटले आहे की,
१. नागरिकांना याविषयी स्पष्टता नसल्याने त्यांच्याकडे दहा रुपयांची नोट देण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नसतो. तसेच त्यांच्याकडे केवळ नाणी असल्यास त्यांच्या खरेदीवर बंधने येतात आणि त्यांची गैरसोय होऊन मनस्ताप होतो.
२. १७ जानेवारी २०१८ या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेने ही नाणी स्वीकारण्याच्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अनेक लोक ही नाणी नाकारतात.
३. ‘नाणी स्वीकारण्यास नकार देणार्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे निर्देशही भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्याविरुद्ध तक्रार केल्यास शिक्षेचे प्रावधानही आहे.
४. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी जे आदेश दिले आहेत, ते सर्व दुकानदार, विक्रेते यांच्यापर्यंत पोचवावेत.
५. नागरिकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क, होर्डिंग, प्रसिद्धीपत्रक इत्यादी माध्यमांतून व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी.
६. अडवणूक करणार्यांवर तत्परतेने कार्यवाही करावी.
या प्रसंगी जळगाव येथे धर्मप्रेमी श्री. राहुल घुगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दुर्गाप्रसाद पाटील, श्री. उमेश जोशी, श्री. प्रशांत जुवेकर; संभाजीनगर येथे सर्वश्री जयसिंग होलीये, प्रकाश कुलकर्णी, रामेश्वर मते; परभणी येथे धर्मप्रेमी अधिवक्ता सर्वश्री अमोल व्यास, लखन व्यास, सुमित पाचलिंग, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीनिवास दिवाण आणि नांदेड येथे धर्मप्रेमी श्री. सोपान सोनटक्के, श्री. मधुकर भरडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश कोंडलवार उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण१. जळगाव येथील निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल पाटील यांना भेटल्यावर त्यांनी संपूर्ण विषय जाणून घेतला. तसेच जिल्ह्याच्या एका अधिकोषाच्या अधिकार्यांना संपर्क करून याविषयी चर्चा केली. निवेदनात दिलेल्या मागणीनुसार एक प्रसिद्धीपत्रक काढण्याविषयीही संबंधित अधिकार्यास सांगितले. २. दुसर्या दिवशी जळगाव येथील सेंट्रल बँकेचे अधिकारी श्री. अरुण प्रकाश यांची भेट घेतली असता ‘अशा प्रकारे शासनाचे चलन नाकारणे गुन्हाच आहे’, असे त्यांनी सांगितले. याविषयी जागृती करण्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढण्याचे आश्वासन दिले. ३. नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संदीप निचीत म्हणाले, ‘‘या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढतो आणि संबंधित अधिकार्यांनाही कळवतो.’’ |