नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी भूमीपुत्रांचे आंदोलन !

पनवेल – नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जानेवारी या दिवशी सहस्रो प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाच्या कामाच्या ठिकाणी आंदोलन केले. आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

जोपर्यंत सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याविषयी सकारात्मक निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत नामकरणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन चालू ठेवणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केला.

आंदोलनाच्या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांच्या भीतीने सिडकोने २३ जानेवारीपासूनच विमानतळाचे काम बंद ठेवले होते. आंदोलनात लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि विमानतळाला नाव देण्याविषयी सरकारने एका मासात निर्णय न घेल्यास एक लाख आंदोलक रस्त्यावर उतरतील आणि आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी या वेळी कृती समितीने दिली.