वाईट शक्ती आक्रमण करून ताप कशा आणू शकतात, तसेच निर्गुणातून आक्रमण करून स्वतःचे स्थान आणि आवरण कशा जाणवू देत नाहीत, हे लक्षात येणे
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
‘९.१२.२०२१ या दिवशी सोलापूर सेवाकेंद्रामधील पू. (कु.) दीपाली मतकर यांचा मला दूरध्वनी आला. त्या म्हणाल्या, ‘‘एका संतांना १०० फॅ. ताप आहे आणि त्यांचे डोके इतके दुखत आहे की, त्या अक्षरशः रडत आहेत. तुम्ही त्यांच्यावर नामजपादी उपाय करू शकता का ?’’ मी म्हटले, ‘‘मी लगेच नामजपाला आरंभ करतो. तुम्ही १० – १५ मिनिटांनी ‘त्यांच्या त्रासामध्ये काय पालट होतो ?’, ते कळवा.’’
१. एखाद्या दूरच्या व्यक्तीवर नामजपादी उपाय करण्यासाठी तिचे स्मरण करून आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्यास त्या व्यक्तीवर उपाय होणे
मी त्या संतांवर उपाय करू लागलो. यासाठी मी त्यांचे स्मरण करून स्वतःवर नामजपादी उपाय करू लागलो. एखाद्या दूरच्या व्यक्तीवर उपाय करतांना तिचे स्मरण केल्यास त्या व्यक्तीची स्पंदने आपल्या शरिरावर जाणवतात आणि तेव्हा आपण आपल्यावर नामजपादी उपाय केल्यावर त्या व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होऊन तिचे त्रास दूर होतात. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’ या अध्यात्मातील सिद्धांतानुसार व्यक्तीचे स्मरण केल्यास तिची स्पंदने आपल्याला जाणवतात.
२. प्रथम त्या संतांवर आवरण न जाणवणे आणि नामजपादी उपाय केल्यावर निर्गुण स्तरावर असलेले आवरण लक्षात येऊन ते दूर करता येणे
त्या संतांवर नामजपादी उपाय करतांना प्रथम मी ‘त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आहे का ?’, हे पाहिले. मला त्यांच्यावर आवरण जाणवत नव्हते. माझ्या मनात विचार आला, ‘त्या संतांना एवढ्या वेदना होत आहेत, याचा अर्थ त्यांच्यावर नक्कीच आवरण आहे; पण वाईट शक्ती ते जाणवू न देऊन आपल्याला फसवत आहेत. वाईट शक्ती निर्गुण स्तरावर आक्रमण करून आवरण नसल्याचे भासवत आहेत.’ त्यामुळे मी दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्याला दोन बाजूंनी टेकवून मनोर्याप्रमाणे (टॉवरप्रमाणे) मुद्रा (छायाचित्र क्र. १) केली आणि ती माझ्या कुंडलिनीचक्रांवरून फिरवली. त्या वेळी मी ‘निर्गुण’ हा नामजप केला. तसे केल्यावर मला त्या संतांच्या शरिरावर काही प्रमाणात आवरण जाणवू लागले. मी नामजपादी उपाय करण्यासाठी पुन्हा नामजप शोधला, तर आता ‘ॐ’ हा नामजप आला. मग मी एका हाताचा तळवा माझ्या शरिराच्या दिशेने ठेवून त्यावर दुसर्या हाताचा तळवा असा ठेवला की, तो तळवा आधीच्या तळव्याच्या विरुद्ध दिशेला येईल. (छायाचित्र क्र. २) हातांची ही मुद्रा करून मी ती मुद्रा माझ्या सर्व चक्रांवरून फिरवली, तेव्हा त्या संतांच्या शरिरावर असलेले सर्व आवरण दूर झाले. या मुद्रेमुळे आपल्यावर वाईट शक्तींकडून सतत येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह रोखला जातो, तसेच स्वतःवरही नामजपादी उपाय होतात. अशी ही दुहेरी अस्त्राप्रमाणे कार्य करणारी मुद्रा आहे.
३. त्या संतांवरील आवरण दूर झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी पुन्हा नामजपादी उपाय शोधले असता मला त्यांच्या डोक्याच्या वर मध्यभागापासून २ सें.मी. उजवीकडे दुखत असल्याचे जाणवले, तसेच ते वाईट शक्तींचे स्थान असल्याचेही जाणवले.
४. डोक्यावरील वाईट शक्तींच्या स्थानी १० मिनिटे उपाय केल्यावर त्या संतांचे डोके दुखणे २० टक्क्यांनी अल्प होणे; पण त्यांचे तापमान १०२ फॅ. झाले असल्याचे कळणे आणि यावरून वाईट शक्तींनी त्या संतांवर आवरण आणून त्यांचा ताप जाणवू न दिल्याचे लक्षात येणे
मला नामजपादी उपायांसाठी ‘ॐ’ हा नामजप मिळाला. त्याप्रमाणे मी डोक्यावरील वाईट शक्तींच्या स्थानी तळहात ठेवून ‘ॐ’ हा नामजप १० मिनिटे केला. त्यानंतर मला पू. दीपाली यांचा दूरध्वनी आला. त्या म्हणाल्या, ‘‘आता त्या संतांचे डोके दुखणे २० टक्क्यांनी अल्प झाले आहे; पण आता त्यांचे तापमान बघितले असता ते १०२ फॅ. झाले आहे.’’ मी म्हटले, ‘‘वाईट शक्तींनी त्या संतांवर आवरण आणून त्यांचा ताप जाणवू दिला नव्हता. आता आवरण काढल्यावर त्यांचा ताप प्रत्यक्ष समजू लागल्याने तो १०२ फॅ. झाला असल्याचे कळले. तसेच वाईट शक्तींनी आवरण आणून त्या संतांच्या डोक्यावरील स्वतःचे स्थानही झाकून ठेवले होते. आवरण काढल्यावर ते लक्षात आले. त्यामुळे आता नामजपादी उपाय करून त्रास दूर करता येईल.’’
५. नामजपादी उपाय केल्यावर डोके दुखणे पूर्णपणे थांबणे आणि तापही उतरणे
मी आणखी अर्धा घंटा नामजप केल्यावर खरोखरच त्या संतांचा त्रास दूर झाल्याचे मला जाणवले. तेव्हा त्यांना दूरध्वनी केल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आता माझे डोके दुखणे पूर्णपणे थांबले आहे, तसेच माझा तापही उतरला आहे. आता मला पूर्ण बरे वाटत आहे.’’
या उदाहरणावरून ‘वाईट शक्ती आक्रमण करून ताप कशा आणू शकतात, तसेच निर्गुणातून आक्रमण करून स्वतःचे स्थान आणि आवरण कशा जाणवू देत नाहीत’, हे लक्षात आले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१२.२०२१)
|